Breaking
Updated: ऑक्टोबर 15, 2025
संघर्षभूमीवर २२ प्रतिज्ञा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा !
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : १४ : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या पाच लाख अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या या २२ प्रतिज्ञा धम्मक्रांतीचा अविभाज्य भाग आहेत. या प्रतिज्ञांची कायम आठवण राहावी म्हणून संघर्षभूमी अंबाजोगाई येथे भव्य असा २२ प्रतिज्ञा स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा धम्मलिपीत कोरलेला भारतातील पहिला २२ प्रतिज्ञा प्रेरणास्तंभ आहे. या स्तंभावरील शिलालेख हा धम्मलिपी व नागरी लिपीमध्ये कोरला असून त्याची भाषा पालि व मराठी आहे. या प्रेरणास्तंभाची उंची १५ फुट आहे. याच प्रेरणास्तंभ परिसरात आज सायंकाळी २२ प्रतिज्ञा दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत बुध्द , सम्राट अशोक व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच समुहीक वंदना घेण्यात आली. तसेच २२ प्रतिज्ञा घेण्यात आल्या. नंतर बलभीम बनसोडे यांनी भीमगीते सादर केली. प्रास्ताविकात विश्वनाथ सावंत यांनी २२ प्रतिज्ञा दिनाचे महत्व व २२ प्रतिज्ञा स्तंभ उभारणीचा उद्देश याबाबत माहिती दिली. याप्रसंगी डॉ गणेश सुर्यवंशी यांचे व्याख्यान संपन्न झाले. ते म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा प्रसंगी २२ प्रतिज्ञा देऊन त्यातून कशाचा त्याग करायचा व कशाचा स्विकार करायचा हे स्पष्ट केले. २२ प्रतिज्ञांमुळे अंधश्रध्देतून मुक्ती मिळाली तसेच धम्म आचरणाला चालना मिळाली. २२ प्रतिज्ञा हा आपल्या मुक्तीचा जाहिरनामा आहे. असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप ॲड शाम तांगडे यांनी केला. ते म्हणाले की तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध धम्मात अनेक पंथ निर्माण झाले. पुढे बौद्ध धम्मापासून वेगळे झालेल्यांनी नंतर स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी धर्म निर्माण केला. या धर्माने पुढे अज्ञान व अंधश्रध्देचा सुळसुळाट करून धम्माला हद्दपार केले. ही बाब लक्षात घेऊन बौद्ध धम्माच्या संरक्षणासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञांचे संरक्षण कवच प्रदान केले आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संजय हतागळे यांनी केले. याप्रसंगी विश्वनाथ सावंत , मुरलीधर कांबळे , सुभाष घाडगे , मिलींद कांबळे , राणोजी वैद्य , बाबुभाऊ कांबळे , चंद्रमणी गोवंदे , नरसिंग तरकसे आदींची उपस्थिती होती.