Breaking
Updated: ऑक्टोबर 11, 2025
पिंपळनेर पोलिसांची तिरंट जुगारावर धडक कारवाई; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – पिंपळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तिरंट नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत एकूण ₹२,७६,५१० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, मौजे म्हाळसजवळा ते पिंपळनेर रस्त्यालगत सारंग खांडे यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली काही इसम पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळत होते. गोपनीय अंमलदार संतोष तावरे यांनी ही माहिती प्रभारी अधिकारी सपोनि मधुसूदन घुगे यांना कळवली. त्यानंतर पोउपनि अर्जुन गोलवाल, ग्रेड पोउपनि दिगांबर मेखले व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने दुपारी २.३५ वाजता घटनास्थळी छापा टाकला.
पोलिसांना पाहताच जुगार खेळणारे इसम पळण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अशी आहेत — नितीन चिंतामन खांडे (४५), राजेंद्र भगवान खांडे (३५), संभाजी गोपीचंद खांडे (३४), अनिल रामा कोरडे (३६) आणि शिवाजी गोपीचंद खांडे (३४), सर्व रा. पिंपळगाव मजरा व म्हासापुर तांडा, बीड.
जप्त मुद्देमालात रोख रक्कम, दोन मोटारसायकली (रॉयल एनफिल्ड बुलेट MH23AK7950 आणि होंडा शाईन), चार मोबाईल फोन (ओपो, रियलमी, सॅमसंग) आणि ५२ पत्त्यांची गड्डी यांचा समावेश आहे.
पोलीस शिपाई संतोष तावरे यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मधुसूदन घुगे, पोउपनि अर्जुन गोलवाल, पोउपनि दिगांबर मेखले, पोलीस अंमलदार अविनाश सानप आणि संतोष तावरे यांनी केली.