Breaking
Updated: ऑक्टोबर 7, 2025
अपघातातून उघड झाली नवजात वासरांची अमानुष तस्करी!
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकडा : आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातातून नवजात वासरांची अमानुष तस्करी उघड झाली आहे. अहिल्यानगर–बीड राष्ट्रीय महामार्गावर एमएच २० बीक्यू ३२३२ क्रमांकाच्या कारमध्ये १५ निष्पाप वासरे निर्दयपणे कोंबून नेली जात होती. त्यांच्या तोंडाला टेप लावून, पाय बांधून त्यांची कत्तल करण्यासाठी तस्करी केली जात होती.
मंगळवारी सकाळी सहा वाजता ही कार अहिल्यानगरहून परळीच्या दिशेने जात असताना दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडकली. या धडकेत कार रस्त्यालगत शुभम रमेश रासकर यांच्या शेडमध्ये घुसली. अपघातानंतर नागरिकांनी धाव घेतली असता, कारच्या आत दिसलेले दृश्य पाहून सर्वजण हादरले. आत १५ नवजात वासरे कोंबलेली दिसली, ज्यातील काही गंभीर जखमी झाली होती.
नागरिकांनी तत्काळ वासरांची सुटका केली. शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दीपक सोनवणे, अशोक मुटकुळे, दादासाहेब सोनवणे, अजिनाथ सोनवणे यांनी वासरांच्या तोंडावरील टेप आणि पायावरील दोर काढून जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे हवालदार भाऊसाहेब आहेर व अमोल नवले घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून वासरांना ताब्यात घेतले असून त्यांना उपचारासाठी गोशाळेत पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.
या प्रकरणी गोमाफीयांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, शिवक्रांती सेनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. प्रदेशाध्यक्ष दीपक सोनवणे यांनी म्हटले की, “तालुक्यात अशा घटना वारंवार घडत आहेत. बाहेरील जिल्ह्यातील गोमाफीया या मार्गावरून सुसाट जातात. या क्रूर तस्करांवर ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी.” तपास कडा पोलीस ठाण्याचे हवालदार भाऊसाहेब आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.