Breaking

गुटखा वाहतूक करणारी कार पकडली; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Updated: ऑक्टोबर 7, 2025

By Vivek Sindhu

गुटखा वाहतूक करणारी कार पकडली; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बेकायदेशीररित्या वाहतूक करणारी कार स्थानिक गुन्हे शाखेने पकडली आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख ७३ हजार २८० रुपयांचा गुटखा आणि कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या निर्देशानुसार गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की शेख मोहसिन शेख सलाउद्दीन हा स्विफ्ट कारमधून गुजरात राज्यातील सुरत येथून बीडकडे गुटखा घेऊन येत आहे.

या माहितीवर विश्वास ठेवून पथकाने कुर्ला-शिदोड मार्गावरील बायपास ब्रिजखाली सापळा रचला. संशयित कार थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधीत पान मसाला गुटखा सापडला. आरोपीकडून चौकशी केली असता त्याने गेवराई येथील शेख सोहेल शेख रहेमोद्दीन याला गुटखा विकल्याचे सांगितले. त्याच्याकडूनही २४ हजार ३०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

या कारवाईत शेख मोहसिन शेख सलाउद्दीन (रा. मोमीनपुरा, बीड), शेख सोनु शेख बादल (रा. महंमदिया कॉलनी, बीड) आणि शेख सोहेल शेख रहेमोद्दीन (रा. गेवराई) या तिघांविरुद्ध पोलीस अंमलदार आशपाक सय्यद यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुटखा वाहतूक करणारी कार आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी बीड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार आनंद मस्के, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, नितीन वडमारे, बाळु सानप, अंमलदार आशपाक सय्यद, मनोज परजणे आणि विकी सुरवसे यांनी केली.


Categories

Recent Posts