Breaking

संचेती हॉस्पिटल येथील बोन बँकमुळे आर्थोपेडिक उपचारांमध्ये प्रगती

संचेती हॉस्पिटल येथील बोन बँकमुळे आर्थोपेडिक उपचारांमध्ये प्रगती

WhatsApp Group

Join Now

पुणे : आर्थोपेडिक उपचारांमध्ये प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत संचेती हॉस्पिटलच्या बोन बँकचा वापर आता आघात झालेले व काही हाडांचे विकार असलेल्या रूग्णांच्या उपचारामध्ये होत आहे.ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी संचेती हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.के.एच.संचेती, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पराग संचेती, ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ.चेतन प्रधान,बोन बँकचे प्रमुख आणि स्पाईन सर्जन डॉ.प्रमोद भिलारे,आर्थोपेडिक सर्जन डॉ.अभिनव भुते व डॉ.साहिल संघवी उपस्थित होते.

या संकल्पनेबद्दल अधिक माहिती देताना संचेती हॉस्पिटल येथील बोन बँकचे प्रमुख आणि स्पाईन सर्जन डॉ.प्रमोद भिलारे म्हणाले की, बोन बँकचे कार्य हे रक्तपेढीसारखेच असते. यामध्ये दात्यांकडून काही विशिष्ट शस्त्रक्रियांदरम्यान वाया जाणाऱ्या हाडांचे भाग प्राप्त करते,ते साठवले जातात.यासाठी दात्यांची कडक निकषांनुसार तपासणी केल्यानंतरच ही प्रक्रिया केली जाते.सध्या संचेती हॉस्पिटलच्या बोन बँकमध्ये जिवंत दात्यांकडून प्राप्त हाडे ही उणे86 डिग्री इतक्या कमी तापमानात सुमारे 6 महिने हे साठविण्यात येतात.खुब्याचा संधिवात,अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस,नेक ऑफ फेमर फ्रॅक्चर (मांडीमध्ये असलेल्या लांब हाडाचे फ्रॅक्चर) अशा स्थितींसाठी खुबा किंवा गुडघ्याच्या सांध्यांची शस्त्रक्रिया ज्यांच्यावर केली जाते ते सामान्यत: दाते बनू शकतात. उदा.खुब्याच्या संधिवातामध्ये जरी कुर्च्या खराब झाला असला तरी हाडांची गुणवत्ता चांगली असते आणि त्यामुळे ते इतरत्र वापरले जाऊ शकतात.दात्याच्या शरीरातून काढलेले हाडांच्या भागांवर गोठविण्यापूर्वी अनेक चाचण्या केल्या जातात.

डॉ.साहिल संघवी म्हणाले की, ही काढलेली हाडे किंवा त्याचे भाग हे अनेक पुर्नरचनात्मक प्रक्रियांसाठी उपयुक्त ठरू शकतात.विशेष करून आघातामुळे झालेले हाडांचे विकार किंवा हाडांमधून ट्युमर काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान याचा वापर होऊ शकतो.यामुळे दात्यांमध्ये पण गुंतागुंत होण्याची शक्यता कमी असते आणि चांगले परिणाम दिसून येऊ शकतात.

ते पुढे म्हणाले की, संचेती हॉस्पिटलच्या बोन बँकची नोंदणी ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स ॲन्ड टिश्यू ॲक्ट 1994 अंतर्गत 10 जुलै 2024 रोजी नोंदणी झाली.आतापर्यंत जिवंत दात्यांकडून दान केलेली 100 हाडे गोठविण्यात आली आहेत.याचा वापर गरजू रूग्णांसाठी केला जात आहे.सध्या खुबा आणि गुडघ्यातील हाडांच्या भोवती रोपण शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रूग्णांकडून हे प्राप्त केले जात आहे.एरवी अशा शस्त्रक्रियांमध्ये या हाडांना टाकून द्यावे लागते. दात्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी बोन बायोप्सी सारख्या विविध चाचण्या केल्या जातात आणि प्रक्रियांनुसार दात्यांकडून संमती प्राप्त केली जाते.या विविध चाचण्या हाडांची गुणवत्ता आणि कुठला संसर्ग नाही ना याची खात्री करण्यासाठी केला जातो.पात्र ठरल्यानंतर ही हाडे काढून गोठविली जातात.

संचेती हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पराग संचेती म्हणाले की, या उपक्रमामुळे अशा शस्त्रक्रियांमध्ये एरवी वाया जाणाऱ्या संसाधनांचा इष्टतम वापर शक्य झाला आहे.काही बाबतीत धातुंच्या रोपणाचा वापर कमी करण्यास देखील मदत होऊ शकते. पुण्यातील आर्थोपेडिक्स क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा असून रूग्णांना चांगले जीवनमान देणारा उपक्रम ठरेल.

ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ.चेतन प्रधान म्हणाले की,अपघात आणि इतर स्थितीमुळे हाडांमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी हा उपक्रम वरदान ठरेल.ही बोन बँक जागतिक दर्जाची असून आतपर्यंत 100 हून अधिक रूग्णांना याचा लाभ झाला आहे.सध्या ही बोन बँक संचेती हॉस्पिटलमधील रूग्णांकरिता उपलब्ध असली तरी एकदा संपूर्ण यंत्रणा रक्तपेढीसारखी सुरळीत झाल्यावर ही सेवा इतर रूग्णालयांकरिता देखील उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही विचार करू.

(छायाचित्रात डावीकडून उजवीकडे : आर्थोपेडिक सर्जन डॉ.अभिनव भुते ,बोन बँकचे प्रमुख आणि स्पाईन सर्जन डॉ.प्रमोद भिलारे,आर्थोपेडिक सर्जन डॉ.साहिल संघवी , संचेती हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.के.एच.संचेती, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पराग संचेती आणि ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ.चेतन प्रधान)

Last Updated: May 31, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.