Breaking
Updated: ऑक्टोबर 7, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : नगरपरिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून, यंदा हे पद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे. या निर्णयानंतर अंबाजोगाई शहरातील राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. सर्व प्रमुख पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी आपापले उमेदवार ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मागील निवडणुकीमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण असल्याने काही नेत्यांना थांबावे लागले होते. मात्र, यंदा खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण आरक्षणामुळे अनेक जुने आणि नवे चेहरे इच्छुक म्हणून पुढे येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईतील राजकीय चित्र आणखी रंगतदार बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे नाव ठामपणे चर्चेत आहे. भाजपकडून अक्षय मुंदडा यांचे नाव चर्चेत असून शेख रहीम आणि शोभा सुनील लोमटे हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते यावर निवडणुकीचे मोठे गणित अवलंबून आहे. काँग्रेसकडून असिफोद्दिन खतीब हे पुढे आले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अद्याप कोणाचेही नाव पुढे आले नाही.
२०१६ च्या निवडणुकीत रचना मोदी यांनी राष्ट्रवादीचे मुंदडा यांच्या गटाला पराभूत करून विजय मिळवला होता. त्या वेळी राजकिशोर मोदी हे काँग्रेसमध्ये होते, तर मुंदडा गट राष्ट्रवादीकडे होता. भाजपकडून शोभा लोमटे यांनी जोरदार लढत दिली होती. यामुळे निवडणूक अटीतटीची ठरली होती. मात्र आजच्या परिस्थितीत समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. राजकिशोर मोदी आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये आहेत, तर मुंदडा कुटुंब भाजपकडे गेले आहे. यामुळे जुने प्रतिस्पर्धी आता वेगळ्या राजकीय छताखाली एकमेकांविरुद्ध उभे राहणार आहेत. शोभा लोमटे मात्र भाजपमध्येच कायम आहेत.
मोदी विरुद्ध मुंदडा : थेट सामना निश्चित?
मागील काही वर्षात मोदी – मुंदडा यांच्यातील राजकीय वितुष्ट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ३० वर्षापासून नगरपरिषद ताब्यात ठेवणाऱ्या राजकिशोर मोदींना कुठल्याही परिस्थितीत घरी बसवायचे असा चंग मुंदडा यांनी बांधला आहे. त्यामुळे आजपर्यंत विधानसभा वगळता इतर कोणत्याही निवडणुकीत प्रत्यक्ष भाग न घेणाऱ्या मुंदडा कुटुंबातून यावेळी उमेदवार दिला जाऊ शकतो. यावेळी अंबाजोगाईची निवडणूक ही प्रत्यक्षात राजकिशोर मोदी विरुद्ध अक्षय मुंदडा अशीच होण्याची शक्यता अधिक आहे. दोन्ही गटांचे शहरात मजबूत संघटन आहे. दोन्ही नेते शहरात प्रभावशाली असून, त्यांच्या समर्थकांमध्ये तयारी जोरात सुरू आहे.
पक्षाऐवजी आघाड्या करून होणार लढत?
अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार विभागले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राजकिशोर मोदी यांच्याकडून आघाडी तयार करून निवडणूक लढविली जाण्याचीही दाट शक्यता आहे. आघाडी असल्यास मोदींनी बाजी मारल्याचा आजवरचा इतिहास आहे. भाजपकडे मागील काही काळात आ. नमिता मुंदडा यांनी शेकडो कोटींचा निधी आणून केलेल्या विकासकामांचा मजबूत आधार आहे, परंतु शहरात बहुलसंख्येने असणारा आणि निर्णायक ठरणारा मुस्लीम समाज भाजपपासून कोसो दूर गेला आहे. त्यांना आपलेसे करण्यासाठी भाजपकडून शेख रहीम यांच्या नावाचाही पर्याय पुढे येऊ शकतो किंवा आघाडीही केली जाऊ शकते. तर, गलितगात्र अवस्थेत असणारी काँग्रेस स्थानिक पातळीवर पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे.
एकंदरीत नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अंबाजोगाईत अनेक वर्षांनंतर खरी राजकीय चुरस अनुभवायला मिळणार आहे. सर्व पक्षांत उमेदवारीसाठी आतून हालचाली सुरू असून, येत्या काही आठवड्यांत चित्र अधिक स्पष्ट होईल. अंबाजोगाईची ही निवडणूक स्थानिक राजकारणातील प्रतिष्ठेची लढत ठरणार असून, कोणता गट जनतेच्या मनात विश्वास निर्माण करतो हेच पुढील पाच वर्षांचे नगरपरिषदेतले सत्तासमीकरण ठरवणार आहे.