Breaking
Updated: ऑक्टोबर 6, 2025
बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदा आणि दोन नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : राज्यातील २४७ नगरपरिषद आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया सोमवारी (दि. ६ ऑक्टोबर) मंत्रालयात पार पडली. या सोडतीनुसार बीड जिल्ह्यातील एकूण आठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित झाले आहे. त्यापैकी पाच खुल्या प्रवर्गासाठी, दोन ओबीसीसाठी तर एक नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखी करण्यात आले आहे. यापैकी पाच ठिकाणी महिला नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे राज्यभरातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाबाबत सोडत काढण्यात आली. राज्यातील २४७ नगरपरिषद व १४७ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांच्या आरक्षणाची ही राज्यव्यापी प्रक्रिया होती. या सोडतीनुसार बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई, धारूर या सहा नगर परिषद आणि केज, आष्टी या दोन नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित झाले. गेल्या तीन वर्षांपासून या सर्व ठिकाणी प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरू होता. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
या सोडतीनुसार बीड नगरपरिषदचे अध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे. अंबाजोगाई, केज आणि धारूर येथे नगराध्यक्ष खुल्या प्रवर्गातून असणार आहे. परळी आणि गेवराई नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. तर माजलगाव आणि आष्टी येथे ओबीसी प्रवर्गातील महिला नगराध्यक्ष होणार आहे. या आरक्षणामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल दिसून येत आहे. खुल्या प्रवर्गात उमेदवारीसाठी इच्छुक नेत्यांची चर्चा वेग घेत असून, महिला आरक्षणामुळे नव्या महिला चेहऱ्यांना राजकारणात संधी मिळणार आहे.
बीड नगरपरिषद – अनुसूचित जाती (महिला)
माजलगाव नगरपरिषद – मागासवर्गीय (महिला)
अंबाजोगाई नगरपरिषद – खुला प्रवर्ग
परळी नगरपरिषद – खुला प्रवर्ग (महिला)
गेवराई नगरपरिषद – खुला प्रवर्ग (महिला)
केज नगरपरिषद – खुला प्रवर्ग
आष्टी नगरपंचायत – मागासवर्गीय (महिला)
धारूर नगरपंचायत – खुला प्रवर्ग