Breaking

३७ लाखांच्या हळद चोरीच्या बनावट प्रकरणाचा अवघ्या २४ तासात उलगडा

Updated: ऑक्टोबर 6, 2025

By Vivek Sindhu

३७ लाखांच्या हळद चोरीच्या बनावट प्रकरणाचा अवघ्या २४ तासात उलगडा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांची तत्पर कारवाई; ट्रकमालक, चालक जेरबंद

अंबाजोगाई : सांगलीला नेण्यासाठी पाठविलेली तब्बल ३० टन हळद लंपास करून पोलिसांना खोटी माहिती दिल्याच्या प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी केवळ २४ तासांत चाणाक्षपणे तपास करत संपूर्ण बनाव उघडकीस आणला. पोलिसांनी हा सर्व बनाव रचणाऱ्या ट्रक चालक व मालक या दोघांना अटक केली आली असून त्यांच्याकडून सुमारे ३७ लाख ८१ हजार ७०० रुपयांची ५७० पोती हळद जप्त केली आहे.

दुर्वा कमोडीटी प्रा. लि. या कंपनीचे संचालक प्रितेश दुर्गाप्रसाद सोनी हे यांनी ३० सप्टेंबर रोजी राधा सर्वेश्वर कंपनी सोलापूरमार्फत ३० टन हळद खरेदी केली होती. ही हळद सांगली येथे पोहोचविण्यासाठी त्यांनी ट्रक क्रमांक एमएच २६ एडी २९३५ या वाहनाद्वारे वाहतूक करण्याचा करार केला. ट्रक मालक नदीम खान मुजाहेद खान (रा. अपना कॉर्नर, परभणी) आणि चालक सय्यद अजगर सय्यद सज्जान (रा. दर्गारोड, परभणी) यांच्याकडे हळदीचा माल सुपूर्द करण्यात आला होता.

परंतु, १ ऑक्टोबर रोजी नदीम खान याने फिर्यादी सोनी यांना फोन करून सांगितले की, अंबाजोगाईजवळ कळंब फाटा परिसरात अज्ञात चोरट्यांनी ट्रक लुटल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलीस ठाण्याचे निरिक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक रंगनाथ जगताप यांनी पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कसून तपास सुरु केला. तपासात ट्रकमध्ये केवळ ३० पोती हळद शिल्लक असल्याचे आणि उर्वरित ५७० पोती गायब असल्याचे आढळून आले.

घटनास्थळावरील परिस्थिती आणि नदीम खान याने दिलेली माहिती यावरून प्रकरण संशयास्पद वाटल्याने सपोनि जगताप यांनी ट्रकचालक सय्यद अजगर याची चौकशी केली असता, त्याने कबुली दिली की कोणतीही लूट झाली नसून ट्रक मालक नदीम खान याच्यासोबत संगणमत करून हळदीचा संपूर्ण माल परभणी येथे उतरवून विल्हेवाट लावला. त्यानंतर पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी ट्रक लुटल्याचा बनाव करण्यात आला.

या खुलाशानंतर पोलिस निरीक्षक खोकले यांनी डीबी पथकातील पीएसआय असद आणि अंमलदारांना तात्काळ परभणीला रवाना केले. या तपासादरम्यान ५७० पोती म्हणजेच २८.५० टन हळद हस्तगत करण्यात आली. या मालाची एकूण किंमत ३७ लाख ८१ हजार ७०० रुपये आहे. पोलिसांनी चालक सय्यद अजगर यास अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे. त्यानंतर ट्रक मालक नदीम खान यालाही अटक करून चौकशी सुरू आहे. प्रकरणाचा तपास सपोनि जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.


Categories

Recent Posts