अंबाजोगाई – विविध घोटाळ्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या अंबाजोगाई येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेतील आणखी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. पतसंस्थेत सन 2000 ते 2012 या कालावधीतएकूण 2 कोटी 29 लाख 93 हजार 717 रुपयांचा अपहार व गैरव्यवहार झाल्याचे विशेष लेखापरीक्षक सतीष काकासाहेब पोकळे यांनी केलेल्या चाचणी लेखापरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एकूण १५ जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतसंस्थेचा तत्कालीन अध्यक्ष कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम याच्या कार्यकाळातच सर्वाधिक गैरव्यवहार झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सतीश पोकळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पतसंस्थेच्या लेखापरीक्षणात बँक खात्यांतील व्यवहार, रोजकिर्दीतील नोंदी आणि चेक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळल्या. काही व्यवहार बँक स्टेटमेंटमध्ये असूनही रोजकिर्दीत नाहीत, काही चेक क्र. नसलेल्या नोंदी आहेत, तर काही रक्कमा रोजकिर्दीत असून बँकेत जमा झाल्याचे पुरावे नाहीत. यामुळे संस्थेच्या आर्थिक विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार, संस्थेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि बँकेतील कर्मचाऱ्यांनी संगनमत करून संस्थेच्या निधीचा अपहार केला. अपहाराची सुरुवात आर्थिक वर्ष 2006–07 पासून झाली असून, संस्थेच्या तत्कालीन प्रमुख पदांवर कार्यरत असलेल्या कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम याच्या कार्यकाळातच सर्वाधिक गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. कुरेशी सोबतच या गुन्ह्यात सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेचा माजी अध्यक्ष भोसले विकास प्रभाकर, प्रभाकर नरबा आरसुडे, महादेव मुकुंदराव मुंडे, कर्मचारी शिवहर महादेव अप्पा आकुसकर यांच्या सह 15 जणांवर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात शासकीय लेखापरीक्षण सतिश पोकळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पंधरा पैकी दहा जण हे अंबाजोगाई डीसीसी बँकेतील कर्मचारी आहेत.
यामध्ये एस.एस. लांडगे (अकॉउंट), यु.डी. देशमुख (इन्स्पेक्टर), ए.एस. पवार (लिपीक), एम.एस. सावरे (लिपीक), एम. आर. कदम (लिपीक), बी. एस. बांगर (सिनियर इन्स्पेक्टर), के. एम. केकान (लिपीक), यु.एस. नागरगोजे (लिपीक), एस.आर. खाडे (एजंट) आणि ए.एन. वाभळे (लिपीक) याचा समावेश आहे. आयपीसी 406, 409 आणि 34 भादविनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल असून स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेत 2 कोटी 29 लाख 717 रूपयांचा घोटाळा करून कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम याने सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्था स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आतापर्यंत स्वामी विवेकानंद पंतसंस्थेमधील आठ कोटीहून अधिकचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.