Breaking

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर अंबासाखरचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ

Updated: ऑक्टोबर 3, 2025

By Vivek Sindhu

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर अंबासाखरचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबासाखर इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार – चेअरमन रमेशराव आडसकर, व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील यांची माहिती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२५-२६ साठीचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवार, दिनांक २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना अंबासाखर इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार असे चेअरमन रमेशराव आडसकर, व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील यांनी जाहीर केले.

याप्रसंगी ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे शुभाशीर्वाद लाभले. तर प्रारंभी सौ.विजयाताई व दत्तात्रय ज्ञानोबाराव पाटील (व्हाईस चेअरमन) तसेच सौ.पल्लवी व रमाकांत बाळासाहेब पिंगळे (संचालक) यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा करून हा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न झाला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर बोलताना अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर म्हणाले की, या भागात कारखाना मंजुरीसाठी ३ प्रस्ताव होते. परंतु, तीन जिल्ह्यांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून १९६९ साली अंबा साखरची सुरूवात झाली. कारखान्यास यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. मागील ५० वर्षांमध्ये या कारखान्याने अनेक चढउतार पहिले आहेत. तसेच आपण अनेक अडचणींना सामोरे ही गेलेलो आहोत. या कारखान्याचे दिवंगत संस्थापक मा.ज्ञानोबारावजी पाटील साहेब व संस्थापक माजी आमदार बाबुरावजी आडसकर साहेब, भगवानराव बापू लोमटे, आनंदराव बापू चव्हाण, ऍड.चेवले साहेब यांच्यासह सहकाऱ्यांनी लावलेल्या या सहकाराच्या रोपट्यामुळे या भागात सहकार चळवळीला बळकटी मिळाली. तसेच या परिसराच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी मोठी मदत ही झाली. साखर कारखानदारी दर तीन ते चार वर्षांत दुष्काळाला सामोरे जाते. त्यामुळे गाळपात सातत्य राहत नाही व हा उद्योग हंगामी चालत असल्यामुळे वेळोवेळी कारखानदारी समोर आर्थिक अडचणी ही उभ्या राहतात. अशा परिस्थिती मध्ये अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना टिकला पाहिजे यासाठी माझे सन २००९ पासूनच प्रामाणिक प्रयत्न राहिलेले आहेत. राज्य व केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय सहकार विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन ८० कोटी रूपये मंजूर करून घेतले. यातून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सांगली, पतसंस्था, शुगरकेन डेव्हलपमेंट फंड, नवी दिल्ली या संस्थांची एक रकमी परत फेडीनुसार थकित देणे देण्यात आली. तसेच थकीत तोडणी वाहतूक करार, थकीत प्रॉव्हिडंट फंड व महावितरणच्या थकलेल्या रकमेसह या सर्व रकमा कारखान्याने अदा केल्यामुळेच व उर्वरित रकमेचा उपयोग ही या कारखान्याची जुनी झालेली यंत्रणा व बॉयलर, मिल, टर्बाईन, मशिनरीची देखभाल दुरूस्ती व काही प्रमाणात मशिनरीचे आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे. आवश्यक बांधकाम, त्यामुळे ८० कोटी रूपये कर्जाचा विनियोग अत्यंत काटकसरीने व योग्य पद्धतीने करण्यात आलेला आहे. पैसे कमी पडत असल्याने व्हाइस चेअरमन दत्तात्रय आबा पाटील, संचालक राजाभाऊ औताडे व मी आम्ही मिळून वैयक्तिक पैसे एकत्र जमवून राहिलेली कामे करीत आहोत. ऊस तोडणी वाहतूक रक्कम ही अदा केली आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांत संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. आगामी हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपाचे उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलेले असून, कारखाना अत्यंत कार्यक्षमतेने चालविणार आहोत. कारखान्याकडे असणारी ३० के.एल.पी.डी.असवानी प्रकल्पातील आपण रेक्टिफाइड स्पिरीटचे उत्पादन घेत होतो, मात्र यापुढे आपण इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय आमच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात कारखान्याला आर्थिक फायदा होणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचे उत्पादन वाढीसाठी यापुढे प्रयत्न करणार आहोत. एआय – कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे यापुढे हा कारखाना सक्षमपणे चालविणार आहोत असे सांगून चेअरमन आडसकर यांनी आपल्या सर्वांचे सहकार्य व मदतीने अंबा कारखान्याला गतवैभव प्राप्त होईल. त्यामुळे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आपला ऊस कारखान्यास गाळपाकरीता पुरविण्यात यावा अशी विनंती व आवाहन केले. तसेच उपस्थित कारखान्याचे सर्व संबंधीत सभासद, संचालक मंडळ सदस्य अधिकारी, कर्मचारी, तोडणी वाहतुक कामगार, व्यापारी, पत्रकार, हितचिंतक यांनी जे आपले अनमोल सहकार्य केले या बद्दल पुनःश्च सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. असे चेअरमन आडसकर यांनी सांगितले. तर प्रारंभी व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. काळाची पावले ओळखून आम्ही उशिरा का होईना पण, एकत्र आलो आहोत. व यापुढे ही एकत्रितपणेच काम करणार आहोत. असे सांगून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी द्यायची आहे. १ तारखेला कामगारांना पगार दिला आहे. ऊस उत्पादक शेतकरी व कामगार ही या कारखान्याच्या रथाची दोन चाके आहेत. त्यांना न्याय देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. अंबा साखरला सचोटीने, चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ तयार आहे, मांजरा धरण भरल्याने पुढील दोन-तीन वर्षे ऊस कमी पडणार नाही. त्यामुळे कारखान्याला गतवैभव मिळवून देवूत, गरजेप्रमाणे मनुष्यबळ वापरले जाईल. अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्र व राज्य सरकार यांचे व्हाईस चेअरमन पाटील यांनी आभार मानले. ते पुढे म्हणाले की, यावर्षी हा कारखाना इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार असून सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला गाळपासाठी देण्याचे आवाहन ही पाटील यांनी. यावेळी माजी आमदार संजयभाऊ दौंड, अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी ही आपले समायोचित विचार व्यक्त केले. या समारंभाला अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक श्री.ऍड.प्रमोद जाधव, ऋषिकेश आडसकर, संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, गोविंद देशमुख, राजाभाऊ औताडे, विजय शिनगारे, बाळासाहेब सोळंके, मधुकर शेरेकर, अनिल किर्दंत, जिवन कदम, लालासाहेब जगताप, अनंत कातळे, विठ्ठल देशमुख, शशिकांत लोमटे, मिनाज पठाण, रमाकांत पिंगळे, श्रीमती भागिरथी साखरे आणि प्रभारी कार्यकारी संचालक एस.बी.साखरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड यांच्यासह केज कृ.उ.बा.समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, अंबाजोगाई पिपल्स को ऑपरेटिव्ह बॅंकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके, संचालक वसंतराव चव्हाण, अंबाजोगाई कृ उ.बा.समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, ऍड.बाळासाहेब ज्ञानोबाराव पाटील, ज्येष्ठ नेते नवाब मामू, भारत पिंगळे, दाजिसाहेब लोमटे, शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट, धारूर कृ.उ.बा.समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबराव पवार, सेवा सहकारी सोसायटी आडसचे चेअरमन उध्दवराव इंगोले, अजय (चिमू) पाटील, शिवाजीराव मायकर, रमेश नखाते, धारूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव खुळे, धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारतराव सोळंके, विजयकुमार खुळे, खोडसचे सरपंच रामधन लाखे, भगवानसेठ भन्साळी, विजयकुमार खुळे, अनंतराव पाटील, ऍड‌.बालासाहेब इंगळे, रामकिसन खोडसे, शशी आडसकर, रणजित लोमटे, पांडुरंग पाखरे, शिवाजीदादा कुलकर्णी, रणजित आडसकर. शिंदे मामा, बाळासाहेब देशमुख, राजपाल देशमुख, अनिल माचवे सर यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बहुसंख्येने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे चीफ अकाउंटंट सुरेश बोराटे, वर्क्स मॅनेजर धीरज वाघोले, मुख्य शेतकी अधिकारी सचिन बागल, चिफ केमिस्ट केशव पाटील, ऊस पुरवठा अधिकारी आनंद शिंदे, चीफ इंजिनिअर प्रशांत सोनार, सिव्हिल इंजिनिअर दत्तात्रय चिल्लरगे, डिस्टलरी इन्चार्ज प्रकाश साळुंके, हेड टाईमकिपर वसुदेव शिंदे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सुरक्षा रक्षक उपस्थित होते. बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरपंच रविकिरण देशमुख यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अंबासाखरचे संचालक राजेभाऊ औताडे यांनी मानले. यावेळी उपस्थितांना चहापान करण्यात आले. तर चेअरमन आडसकर व व्हाईस चेअरमन पाटील यांच्यासह सर्व सन्माननीय संचालकांनी उपस्थित सर्वांच्या भेटी घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून संवाद साधला.


Categories

Recent Posts