Breaking

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला रुमणे मोर्चा

Updated: ऑक्टोबर 1, 2025

By Vivek Sindhu

ओळ दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा : अमर देशमुख

अंबाजोगाई : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने अंबाजोगाई येथे भव्य रुमणे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी केले. हा मोर्चा नगर परिषदेपासून निघून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शेकडो शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

मोर्चादरम्यान करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने देणे, खरडून गेलेल्या जमिनींसाठी एकरी २.५ लाख रुपयांची मदत, तसेच संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, अपंग व विधवा महिलांचे थकीत मानधन तात्काळ देणे यांचा समावेश आहे. शिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी माफ करणे, शेतमजुरांना थेट आर्थिक मदत, ई-पिक पाहणी व फार्मर आयडीची अट शिथिल करणे, मृतांच्या वारसांना अनुदान व जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी, मका, तूर आणि ऊस या पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी तळी फुटून पाणी शेतात शिरल्याने शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. पशुधन वाहून जाण्याच्या आणि मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी हवालदिल झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. नेत्यांनी इशारा दिला की, जर मागण्या तातडीने मंजूर केल्या नाहीत तर शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

या रुमणे मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेसाहेब देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांच्यासह कार्यकर्ते, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Categories

Recent Posts