Breaking

ऊस तोडणी यंत्र चालकांचे कौशल्यवृद्धी प्रशिक्षण संपन्न

Updated: ऑक्टोबर 1, 2025

By Vivek Sindhu

कृषी विज्ञान केंद्र डिघोळअंबाचा उपक्रम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

कृषी विज्ञान केंद्र डिघोळअंबाचा उपक्रम

अंबाजोगाई- दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र डिघोळआंबा येथे ऊस तोडणी यंत्र – वापर व निगा या विषयी चालक व मालक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम 29 व 30 सप्टेंबर दरम्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख नरेंद्र जोशी तर प्रमुख अतिथी शक्तिमान तीर्थ ऍग्रो प्रा. लि. यांचे अभियांते बंडोपंत कुलकर्णी, सिद्धेश्वर वाडीकर तसेच केंद्राचे कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना प्रमोद रेणापूरकर म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्र कृषी यांत्रिकीकरणाच्या प्रचार प्रसारासाठी सातत्याने यंत्र मालक व चालकांचे प्रशिक्षण घेत असून त्यांच्या कौशल्य वृद्धीच्या माध्यमातून काटेकोर शेती ला प्राधान्य देत आहे. ऊस तोडणी यंत्राबाबतची पूर्ण ओळख होऊन या यंत्राच्या काळजी व निगा बाबत चालक सजग व्हावा यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कार्यक्षेत्रातील ऊस वेळेवर तोडणी होण्यास मदत करणाऱ्या ऊस तोडणी यंत्र मालकाचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना नरेंद्र जोशी म्हणाले की ऊस तोडीचे जिकरीचे काम कमी श्रमात कमी वेळेमध्ये साध्य करण्याकरता ऊस तोडणी यंत्र महत्त्वाचे ठरत आहेत. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध असून या मध्ये काम करणाऱ्या विविध लोकांचे स्थलांतर रोखून स्थानिक ठिकाणीच विविध कृषी पूरक जोडधंदे उभा करून त्यांचा सक्षम विकास करण्याची गरज असल्याचे सांगून कृषी विज्ञान केंद्र त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी विशद केले. अशा प्रसंगी ऊस तोडणी यंत्र हे यांत्रिकी शेतीस फायदेशीर ठरेल असे त्यांनी सांगितले. यानंतर तांत्रिक सत्रात बंडोपंत कुलकर्णी यांनी ऊस तोडणी यंत्राच्या विविध भागाची ओळख जसे की रोलर, हायड्रोलिक मोटर्स , हायड्रोलिक सिलेंडर , हायड्रोलिक पंप ,ऑपरेटिंग लिवर्स यांचे कार्यपद्धती सांगून यंत्र वापरापूर्वी ,दरम्यान व नंतर घ्यावयाच्या काळजी व निगाबाबत सादरीकरण द्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. रेणापूरकर यांनी हे यंत्र खरेदी करण्यासाठी असलेली शासकीय योजना, प्रोत्साहन पर अनुदान तत्व, कर्ज सुविधा याविषयी सविस्तर माहिती दिली. द्वितीय दिवशी स्वच्छता पंधरवाडा निमित्त उपस्थित प्रशिक्षणार्थींना स्वच्छतेची शपथ देऊन रेणापूरकर यांनी एअर फिल्टर खराब तसेच रेडिएटर चोक असेल तर इंजिन गरम होऊन डिझेल जास्त लागते व इंजिन लोडवर येवून ऑइल लेव्हल कमी होऊन इंजिनचे आयुष्यमान कमी होते असे सांगितले. यंत्र वापरत असताना इंजिन ऑइलची पातळी, कुलंटची पातळी योग्य राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टायर मधील हवा दैनंदिन तपासणी करणे गरजेचे असून सर्व पॉईंट्सला ग्रीसिंग करून रोलर ला लागलेली माती साफसफाई करणे हेही तितकेच आवश्यक असल्याचे रेणापूरकर यांनी सांगितले. सिद्धेश्वर वाडीकर यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर या यंत्राच्या संचलनाबाबत माहिती देऊन प्रत्येक चालकाला अनुभूती प्रात्यक्षिक देण्यात आले. या प्रसंगी मालक व चालकांच्या शंकांचे निरसन अभियंता रेणापूरकर व बंडोपंत कुलकर्णी यांनी केले. जवळबन तालुका केज येथील यंत्रमालक श्री संदीप करपे म्हणाले की आमच्याकडे हे यंत्र तीन वर्षापासून असून यामध्ये सातत्याने संशोधन होऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव होऊन सुधारित यंत्र येत आहेत. यांची माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून होऊन यंत्र चालविण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.कार्यक्रमास केज, अंबाजोगाई, धारूर, परळी या तालुक्यातील 44 यंत्रमालक व चालक यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.


Categories

Recent Posts