Breaking
Updated: सप्टेंबर 30, 2025
नगरपरिषद अंबाजोगाईच्या वतीने लोककल्याण मेळाव्याचे आयोजन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) -प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (पीएम-स्वनिधी) यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. सदर योजनेला मार्च – २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने अंबाजोगाई शहरातील सर्व स्थिर, फिरता, तात्पुरत्या फेरिवाल्यांना विविध राष्ट्रीयकृत बँकांमार्फत खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती नगरपरिषद अंबाजोगाईच्या मुख्याधिकारी श्रीमती प्रियांका टोंगे यांनी दिली. त्या नगरपरिषद अंबाजोगाईच्या वतीने आयोजित लोककल्याण मेळाव्यात बोलत होत्या.
नगरपरिषद अंबाजोगाईच्या वतीने लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दीनदयाळ जनआजिविका योजना – शहरी (डिजेएवाय-एस) अंतर्गत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (पीएम-स्वनिधी) या संदर्भात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदच्या मुख्याधिकारी श्रीमती प्रियांका टोंगे या होत्या, या प्रसंगी स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे, तसेच आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी महेश अंजान, शहर अभियान व्यवस्थापक दिलीप तांबारे, शहर अभियान व्यवस्थापक समीर शेख इत्यादींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी लोककल्याण मेळाव्यास सिएलएफ, एएलएफचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (पीएम-स्वनिधी) अंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी व महिला बचत गटाच्या सदस्या व कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सदरील मेळाव्या मध्ये मुख्याधिकारी यांनी मार्गदर्शन करताना शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे तसेच शहरातील फेरीवाल्यांनी (पीएम-स्वनिधी) योजने अंतर्गत घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करावी. आणि बँकेमध्ये आपली पत निर्माण करून अशा शासकीय योजनांचे लाभ शहरातील पात्र लाभार्थींनी घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन या प्रसंगी केले. सदरील मेळाव्यामध्ये बँकांमार्फत अनेक लाभार्थींना कर्ज वाटप ही करण्यात आले. शहर अभियान व्यवस्थापक समीर शेख यांनी (पीएम-स्वनिध) योजनेची सविस्तर माहिती दिली व तसेच जास्तीत – जास्त लाभार्थ्यांनी स्वनिधी से सुमृद्धी योजनेचे प्रोफिलिंग करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. दीनदयाळ जनआजिविका योजना-शहरी (डिजेएवाय-एस) योजने अंतर्गत लाभार्थींना घटकनिहाय मिळणारे लाभ यांची सविस्तर माहिती शहर अभियान व्यवस्थापक दिलीप तांबारे यांनी दिली. कार्यक्रम यशस्वितेसाठी मल्हारी जोगदंड, शहर समन्वयक लखन ओहळ, सोनाली शिंदे, शिवाजी जावीर, तसेच शहरस्तर संघाच्या अध्यक्षा श्रीमती रोहिणी कडेकर, सिआरपी निर्गुण हावळे, सीमा खतीब, मनिषा वाघमारे, प्रियांका राऊत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. तसेच आनंदी, आदिशक्ती, आईसाहेब, प्रगती, त्रिभुवनी, भाव्या, श्री रेणुका इत्यादी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सदस्यांची उपस्थिती होती.