Breaking
Updated: सप्टेंबर 30, 2025
अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडीसह आक्रोश मोर्चा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) पक्षाच्या मोर्चातून दिसून आला जनतेचा आक्रोश
याबाबत अधिक माहिती देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) पक्षाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी सांगितले, आम्ही दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. नुकतीच आम्ही अंबाजोगाई तालुक्यातील ग्रीनबेल्ट आणि डोंगरपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. त्यानुसार शेतपिक व फळबागांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, शेती-शेतपिक व फळबागांचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, घरांची पडझड, स्थलांतरीत कुटूंबांना आर्थिक मदत करावी, वैयक्तीक नुकसान, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, पिक विमा, अनेक भागातील विज पुरवठा बंद आहे तो सुरळीत करावा. संजय गांधी/श्रावणबाळ योजनांचे लाभार्थी यांचे मानधन थकले आहे ते तात्काळ देण्यात यावे, मांडवा (पठाण), ता.अंबाजोगाई (जि.बीड) येथे गायरानधारक शेतकऱ्यांचा पोटखराबा रद्द करून वहितीची नोंद तात्काळ करून घेण्यात यावी, बीड जिल्ह्यातील गायरानधारक कसत असलेल्या जमीनीवर शासनाने कसल्याही प्रकारच्या प्रकल्पांना मंजूरी देऊ नये, यासह अंबाजोगाई तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देऊन ओला दुष्काळ जाहीर करून त्याअनुषंगाने विज बील वसूली, कर्ज वसूली करू नये, शैक्षणिक शुल्क माफ करावे. अशा व या अनुषंगाने दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करण्यात याव्यात. झालेल्या सर्व नूकसानीचे सरसकट पंचनामे तातडीने करण्यात यावेत. शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ जिरायती, बागायती फळबागांसाठी नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर बांधवांना ही तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती आम्ही शासन व प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे असे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. तसेच या प्रश्नांवर आज मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि मानधनापासून वंचित असलेल्या विविध शासकीय योजनांचे लाभार्थी अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या बैलगाडीसह मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चात सहभागी झाले हे दिसून आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) पक्षाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे, बीड जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, मराठवाडा प्रवक्ता धिमंत राष्ट्रपाल, महिला जिल्हाध्यक्षा मिनाताई लोंढे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष बादल तरकसे, मुक्ता पाडुळे (संवेदना फेलोशिप) यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. तर गणेश उपाडे यांसह शेकडो शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि मानधनापासून वंचित असलेल्या विविध शासकीय योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एकाही मंत्र्याला बीड जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही, तोंडाला काळं फासू :
गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेती उध्वस्त झालेली आहे. पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयांवर आम्ही हालगी वाजवत बैलगाडी मोर्चा काढला. शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई अनुदान द्या, तसेच बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशा विविध मागण्यां करीत हा मोर्चा काढण्यात आला. यापुढे एकाही मंत्र्यांला बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही, तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा देत आहोत. याची शासन व प्रशासन यांनी नोंद घ्यावी.
~ अक्षय भुंबे
(मराठवाडा विभागीय अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-खरात गट )