Breaking
Updated: सप्टेंबर 25, 2025
आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश; विद्युत विषयक कामांना मिळणार गती
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश; विद्युत विषयक कामांना मिळणार गती
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील दीर्घकाळ प्रलंबित मागणी मान्य करत महावितरण कंपनीने अंबाजोगाई उपविभागाचे विभाजन करून नवीन अंबाजोगाई उपविभाग क्र. २ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार असून नागरिकांना थेट फायदा होणार आहे. यासाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा या अनेक दिवसापासून प्रयत्नशील होत्या.
‘महावितरण’ मुंबईच्या मुख्य कार्याल्लायाने दिलेल्या आदेशानुसार अंबाजोगाई ग्रामीण उपविभागाचे विभाजन करण्यात आले आहे. विद्यमान उपविभागाचे नामकरण अंबाजोगाई उपविभाग क्र. १ असे करण्यात आले असून त्यात अंबाजोगाई शहर शाखा १ आणि २, अंबाजोगाई ग्रामीण शाखा १ आणि दोन, तर नव्या उपविभाग क्र. २ मध्ये पाटोदा, लोखंडी सावरगाव, बर्दापुर, घाटनांदुर आणि उजणी शाखा कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.
नव्या उपविभागाच्या आस्थापनेवर एकूण १२ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. यात उपकार्यकारी अभियंता (वितरण), कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक लिपिक, शिपाई आदी पदांचा समावेश आहे. या नव्या पदनियुक्तींसाठी वार्षिक खर्च सुमारे १ कोटी २६ लाख ७३ हजार रुपये तर कार्यालय निर्मितीसाठी प्रशासकीय खर्च ९ लाख ८८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या उपविभाग निर्मितीसाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अंबाजोगाई तालुक्यातील लोकसंख्या, विस्तारित क्षेत्रफळ आणि वाढते प्रशासकीय काम पाहता स्वतंत्र उपविभागाची गरज असल्याचे त्यांनी शासन आणि महावितरण कंपनीसमोर वारंवार मांडले होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून तालुक्यातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या निर्णयामुळे अंबाजोगाई व परिसरातील वीज वितरणाची कामे अधिक वेगाने पार पडतील, शेतकरी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तात्काळ होईल, तसेच उपविभागीय पातळीवरील कार्यालयीन दिरंगाई टळणार आहे. याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजाताई मुंडे व उर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांचे आभार मानले आहेत.