Breaking

राज्य शासन आयोजित गणेशोत्सव स्पर्धेत अंबाजोगाईच्या सरस्वती गणेश मंडळाला जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

Updated: सप्टेंबर 24, 2025

By Vivek Sindhu

राज्य शासन आयोजित गणेशोत्सव स्पर्धेत अंबाजोगाईच्या सरस्वती गणेश मंडळाला जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : शहरातील सरस्वती गणेश मंडळाने यंदा गणेशोत्सवात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून राज्य शासन आयोजित जिल्हास्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. या यशामुळे अंबाजोगाईत आनंदाचे वातावरण आहे.

गणेशोत्सव काळात मंडळाने शालेय भिंतीचे काम करून शैक्षणिक सुविधा उभारल्या, पुस्तक बँकेद्वारे विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून दिले. नगरपालिका कर्मचारी, वीज विभाग व पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना पावसाळी जॅकेट वाटले. गरजू महिलांना शिलाई मशीन देऊन २५ महिलांना आरीवर्क प्रशिक्षण दिले. वृद्धांना काठी व चष्मे वाटले. “फिरती माणुसकी भिंत” या उपक्रमातून सामाजिक संदेश दिला.

शहरात स्वच्छता मोहिमेत सहभाग, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, पोलिसांचा सत्कार, योग-प्राणायाम शिबिर, मतिमंद मुलींकरिता स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद निमित्त रचना वाटप, दिवाळीत फराळ संकलन, मोबाईलचे फायदे-तोटे दर्शविणारा देखावा, तसेच शासकीय योजनांची जनजागृती अशा विविध उपक्रमांनी मंडळाने वेगळेपण सिद्ध केले.

मंडळाने ‘मिशन सिंदूर’ व ‘ब्रह्मोज’ यशस्वी उपक्रम देखाव्यातून दाखवले. मोफत आधार व आयुष्यमान कार्ड अपडेट, शैक्षणिक व सामाजिक जनजागृतीसाठी उपक्रम राबवले.

दहा दिवस चाललेल्या या गणेशोत्सवात शिस्तबद्ध आयोजन, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल दिसली. शासनाकडून मिळालेला द्वितीय क्रमांक हा मंडळाच्या कार्याचा गौरव मानला जात असून पुढील वर्षी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला आहे.


Categories

Recent Posts