Breaking
Updated: सप्टेंबर 24, 2025
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत करा - राजेसाहेब देशमुख
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबुधवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव, धानोरा खुर्द, तटबोरगाव, अंजनपूर, कोपरा, देवळा, आपेगाव आदी गावांतील पूरपरस्थिती जाणून घेतली. अनेक ठिकाणी स्वतः चिखल तुडवत पाण्याच्या प्रवाहातून पायी चालत पाहणी केली. तसेच मंगळवारी परळी वैजनाथ तालुक्यातील आणि डोंगर पट्ट्यातील गावोगावी जाऊन भेटी दिल्या, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील नागरिक, शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह तरूण, मुलांशीही संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या पाहणी वेळी देशमुख यांनी अनेकांच्या शेतातील बांध फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली आहे. मांजरा, जायकवाडी सारखी मोठी धरणे भरल्याने सतत दरवाजे उघडण्यात आले, अतिवृष्टीमुळे पाझर तलाव व साठवण तलाव भरून फुटले, नद्यांनी पातळी सोडून त्या पात्राबाहेर पडल्यामुळे ते पाणी शेतांमध्ये शिरले. उभी पिके वाहून गेली, शेत जमीनीची माती खरवडून गेली आहे. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील मांजरा नदी काठावरील देवळा, अकोला, तडोळा, धानोरा (खुर्द), तटबोरगाव, माकेगाव, आपेगाव, अंजनपूर, कोपरा, बनसारोळा आदी गावांतील सरसकट पंचनामे करून यातून कोणालाही न वगळण्याची विनंती त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना केली आहे. ही परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, आर्थिक मदत करावी अशी मागणी राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उबाठा पक्षाचे नेते मदनलाल परदेशी, अच्युत ढगे, प्रविण देशमुख, केशव नाना ढगे, प्रविण पापा सोमवंशी, दिलीप ढगे, अतुल देशमुख, अस्लम भाई, डॉ.अजय ठोंबरे, बाळासाहेब ढगे, शिवनारायण ढगे, मुस्तफा सय्यद ताहेर पठाण हे पाहणी वेळी उपस्थित होते.
मदतीचे निकष बदला ; गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना दिलासा
महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू झाल्यामुळे अंबाजोगाई व परळी वैजनाथ तालुक्यात शेतीचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. कापूस पीक अडचणीत आले आहे. संत्रा आणि मोसंबी यांची गळती सुरू झालेली आहे. कांदासह संपूर्ण खरीप पीके खराब होणार आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात देण्याची गरज आहे. एकीकडे निवडणूकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. परंतु, त्यावरती फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे ही तोंडावर बोट धरून गप्प आहेत. दुसरीकडे बीड जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात ३० मे २०२५ च्या शासन आदेशाप्रमाणे केवळ दोन हेक्टर शेतीला नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यात ही नुकसान भरपाई कोरडवाहू क्षेत्रासाठी केवळ ८५००/- रूपये प्रति हेक्टर आणि बागायतीसाठी १७ हजार रूपये प्रति हेक्टर एवढीच जाहीर झालेली आहे. ही रक्कम अत्यल्प असून यातून शेतकरी उभा राहणे अशक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने मदतीचे निकष बदलावेत व आता तीन हेक्टर शेतीला नुकसान भरपाई द्यावी. मांजरा पट्ट्यातील शेतकरी आज उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांनी बि-बियाणे, खत, शेती सुधारणेवर प्रचंड प्रमाणावर खर्च केला आहे. या संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. दसरा -दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर आणि पुढील हंगामात तग धरून राहण्यासाठी सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, आर्थिक मदत करावी. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल.
~ राजेसाहेब देशमुख
(नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)