Breaking
Updated: सप्टेंबर 19, 2025
मल्टिस्टेटच्या १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १०% लाभांश जाहीर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमल्टिस्टेटच्या १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १०% लाभांश जाहीर
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- श्री योगेश्वरी मल्टिस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेचा सन २०२४-२५ या वर्षाची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात संस्थेचे सर्व सभासद, ग्राहक,ठेवीदार व हितचिंतक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रिकबचंद सोळंकी यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. याप्रसंगी त्यांनी श्री योगेश्वरी मल्टिस्टेट ही संस्था गरजवंतांच्या तसेच निराधारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे आवर्जून उल्लेखित केले. संस्थेचा सन २०२४-२०२५ चा १२ वा वार्षिक अहवाल सादर करतांना मार्च २०२४ अखेर रुपये ९९ लाखाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती सांगत सभासदांना १०% लाभांश जाहीर केला. अध्यक्ष रिकबचंद सोळंकी हे संस्थेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचा अहवाल सादर करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी, अध्यक्ष रिकबचंद सोळंकी यांच्यासह संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक उपस्थित होते.
संस्थेचा १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वप्रथम शहराचे आराध्यदैवत श्री योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनंतर आर्थिक वर्षात निधन झालेल्या संस्थेच्या ग्राहक व हितचिंतकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष ढगे यांनी मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सादर केले. प्रारंभी त्यांनी उपस्थित सर्व ग्राहक तसेच ठेवीदार, सभासद यांच्यासह संस्थापक राजकिशोर मोदी यांचे स्वागत केले. संस्थापक राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांसठी श्री योगेश्वरी मल्टिस्टेट ची स्थापना केली. या संस्थेद्वारे हजारो तरुण बेरोजगार , व्यापारी तसेच शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात आर्थिक सहकार्य केले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष ढगे यांनी याप्रसंगी नमूद केले. त्यानंतर वार्षिक सभेपुढे ऐनवेळी येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा होऊन त्यास मंजूरी घेण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात रिकबचंद सोळंकी यांनी संस्थेस मिळालेल्या या अभूतपूर्व यशाचे श्रेय हे श्री योगेश्वरी मल्टिस्टेट चे संस्थापक राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शन व प्रेरनेला दिले. तसेच मल्टिस्टेटचे उपाध्यक्ष शेख अन्वर हुसेन शेख वली हसन ,संचालक सुधाकर टेकाळे , ऍड विलास लोखंडे, ऍड अनिल लोमटे , विलास सिद्राम जाधव , भागवत रामकृष्ण मसने , संकाये अप्पासाहेब त्रिंबकआप्पा, शेख मुक्तार फकीर अहमद, तज्ञसंचालक लक्ष्मीकांत बजाज, कांतीलाल शर्मा तसेच संचालिका श्रीमती आशालता वांजरखेडकर , सौ. खडके मंदाकिनी बाजीराव यांच्यासह संस्थेचे सभासद, ग्राहक , ठेवीदार ,आणि कर्जदार यांना दिले.
योगेश्वरी मल्टिस्टेट चे अध्यक्ष रिकबचंद सोळंकी यांनी २०२५ चा वार्षिक ताळेबंद देतांना प्रथमतः त्यांनी संस्थापक , मार्गदर्शक राजकिशोर मोदी यांचे संस्थेने १२ वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.सर्व सभासद , ग्राहक ,आणि संस्थेच्या हितचिंतकांचे देखील आभार याप्रसंगी व्यक्त केले . सध्याच्या परिस्थिती मध्ये अनेक बँका , पतसंस्था , मल्टिस्टेट सोसायटी या अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. तर काही दिवाळखोरीत निघाल्या आहेत असे असताना देखिल श्री योगेश्वरी मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी ही नेत्रदीपक कामगीरी करत असल्याचे आनंदाने सांगितले . यात संस्थेच्या ग्राहकांचा , ठेवीदारांचा , खातेदार आणि हितचिंतक यांचा देखील मोलाचा वाटा असल्याचे देखील सोळंकी यांनी आवर्जून स्पष्ट केले .
पुढे संस्थेच्या आर्थिक विवेनचन करतांना अध्यक्ष रिकबचंद सोळंकी यांनी मार्च २०२५ अखेर १७२८ सभासद असल्याचे सांगितले . संस्थेचे भाग भांडवल एकूण ७० लाख रुपये असल्याचे स्पष्ट केले . तसेच संस्थेकडे एकूण ठेवी रुपये २६ कोटी एवढया असून संस्थेच्या वतीने सभासद व ग्राहकांना एकूण कर्जवाटप हे रुपये १८ कोटी एवढे झाले असल्याचे यावेळी नमूद केले . त्याचबरोबर संस्थेची एकूण गुंतवणूक अंबाजोगाई पिपल्स बँक रुपये १२ कोटी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था २ कोटी, आदर्श मल्टिस्टेट परळी ४१ लाख, त्याचबरोबर आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ४१ लाख एवढी असून एकूण १५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे अध्यक्ष रिकबचंद सोळंकी यांनी सांगितले. संस्थेचे लेखा परीक्षण मे अंकित जैस्वाल यांनी करत अहवालात संस्थेचा एन पी ए हा ४.२ एवढा दाखवण्यात आला आहे त्याचबरोबर आर्थिक वर्ष मार्च २०२५ अखेर श्री योगेश्वरी मल्टिस्टेट या संस्थेने ६५ लाख रुपये एवढा निवळ नफा मिळविला असल्याचे आवर्जून सोळंकी यांनी सांगितले. झालेल्या या नफ्यातूनच संस्थेच्या सर्व सभासदांना १०% लाभांश देण्याचे याप्रसंगी जाहीर केले.संस्थेकडून ग्राहक तसेच ठेवीदारांना अत्यंत किफायतशीर असे व्याजदर देण्यात येते. जेष्ठ नागरिक , अपंग तसेच महिलांना ०.५०% अधिकचे असे व्याजदर देण्यात येत आहे.
श्री योगेश्वरी मल्टिस्टेटच्या मुख्यालयात ६ कर्मचारी आणि २ नित्य निधी ठेव प्रतिनिधी कार्यरत आहे. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शाखाधिकारी संतोष ढगे, प्रदीप काकडे, विष्णु गुजर , उमेश साखरे, वैभव देशमुख आणि अंकुश माने यांचा समावेश आहे . संस्थेच्या अंबाजोगाई आणि बसवकल्याण अश्या दोन शाखा ग्राहकांना सेवा देत असून यापुढेही ग्राहक तथा ठेवीदारांना उत्कृष्ट अशी सेवा देण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष रिकबचंद सोळंकी यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.