Breaking
Updated: सप्टेंबर 17, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित सेवा पंधरवड्याचा शुभारंभ अंबाजोगाईत उत्साहात झाला. मराठवाडा मुक्तिसंग्राम ध्वजारोहणानंतर झालेल्या उद्घाटन समारंभास विधानसभा सदस्य नमिता अक्षय मुंदडा, अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे व तहसीलदार विलास तरंगे उपस्थित होते.
याप्रसंगी गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था व स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल नगरपरिषद मुख्याधिकारी प्रियांका टोंगे, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे आणि स्वच्छता पर्यवेक्षक मल्हारी जोगदंड यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
महसूल व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने 2011 पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमन करून ताराबाई घडवे, धनु डाके, अनंत होके, प्रशांत होके, सुमनबाई ढगे यांना पट्टे देण्यात आले. तसेच अतिक्रमित शेतरस्ते मोकळे करून विमल डुकरे (वरपगाव), निवृत्ती भगत, रखमाजी शिंपले (चनई), विश्वंभर पिसाळ (कुंबेफळ) यांना सातबारा वाटप करण्यात आले.
या सेवा पंधरवड्यात 17 ते 22 सप्टेंबरदरम्यान अतिक्रमित रस्त्यांचे सीमांकन व क्रमांक देण्याची कारवाई होणार आहे. 23 ते 27 सप्टेंबरदरम्यान “सर्वांसाठी घरे” मोहिमेत मोठ्या प्रमाणावर पट्टे वाटप होईल. 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान महसूल मंडळ स्तरावर जनता दरबार, सस्ती अदालती, महाराजस्व अभियानांतर्गत मदत वितरण, ॲग्री स्टॅक नोंदणी, शालेय प्रमाणपत्र व पुरवठा सेवा देण्यात येणार आहेत.
यावेळी नमिता मुंदडा यांनी सेवा पंधरवड्याची अधिकृत घोषणा केली. अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी दीपक वाजाळे यांनी प्रस्तावना सादर करून संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली.
या वेळी गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, स्मिता बाहेती, मिलिंद गायकवाड, जिडगे, सचिन देशपांडे, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी-कर्मचारी, सुजाण नागरिक व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. तहसीलदार विलास तरंगे यांनी आभार मानले.