Breaking
Updated: सप्टेंबर 15, 2025
प्रशासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा द्यावा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअखिल भारतीय किसान सभेचे आवाहन
अंबाजोगाई : आज मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात विशेषतः परळी आणि धारूर तालुक्यातील डोंगरपट्ट्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ढगफुटीप्रमाणे झालेल्या या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून रस्ते व पूल खचल्याच्या, पाण्याखाली गेल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. नदीचे तटबंध तुटून वाहणाऱ्या पाण्याने शेतजमिनी वाहून गेल्या असून पुढील ५ ते १० वर्षांतही भरून न निघणारे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेल्याच्या व जीवितहानी झाल्याच्या वार्ता मिळत आहेत. विहिरी, ठिबक संच, स्प्रिंकलर सेट व शेतीची विविध अवजारे पुराच्या पाण्याने वाहून गेली आहेत. गावागावात विद्युत खांब कोसळले असून पिण्याच्या पाण्याची तसेच आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाची स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पूराचे पाणी ओसरल्यानंतर खरी परिस्थिती व नुकसानीचे प्रमाण स्पष्ट होईल.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अजय बुरांडे यांनी शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाला तातडीने गावांचा संपर्क पुनर्संचयित करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना धीर देऊन पुढील काळात झालेल्या नुकसानीप्रमाणे भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बुरांडे यांनी शेतकऱ्यांना खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करण्याचे आवाहन करताना, “किसान सभा सदैव संघर्षात शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आपण पुन्हा संसार उभारू, आजच्या संकटात धैर्य राखावे,” असे सांगितले.