Breaking

अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Updated: सप्टेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

बँकेकडून सभासदांना ९% लाभांश देण्याचा संकल्प

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बँक हे केवळ आर्थिक व्यवहाराचा मंच नसून समाजाच्या उन्नतीचा दीपस्तंभ आहे-राजकिशोर मोदी

बँकेने ३१ मार्च अखेर १२०० कोटींचा बँकिंग व्यवसाय करत ६०० कोटींच्या ठेवी पूर्ण केल्या

अंबाजोगाई (प्रतिनिधी ):-विश्वास, सेवा आणी सहकार्य या तीन तत्वावर चालणाऱ्या अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि १३ रोजी शहरातील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात बँकेचे सर्व ग्राहक, सभासद व खातेदारांच्या उपस्थितत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी बँक हे केवळ आर्थिक व्यवहाराचाच मंच नसून समाजाच्या उन्नतीचा दीपस्तंभ असल्याची भावना व्यक्त केली. जनसामान्यांच्या आर्थिक विकासाला गती मिळून त्यांचे जीवनमान उंचावे यासाठी अंबाजोगाई पिपल्स बँकेची मागील २९ वर्षांपूर्वी निर्मिती केली असेही मत देखील या सर्वसाधारण सभेत राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी , उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी ,यांच्यासह पिपल्स बँकेचे संचालक प्रा. वसंत चव्हाण , ऍड विष्णुपंत सोळंके, पुरुषोत्तम चोकडा ,ऍड सुधाकर कऱ्हाड, संकेत मोदी, सुधाकर विडेकर, शेख दगडू शेख दावल, प्रकाश लखेरा,श्रीमती वनमाला रेड्डी, स्नेहा हिवरेकर, हर्षवर्धन वडमारे, तज्ञ संचालक संदेश बोराडे, प्रा. बाळासाहेब चव्हाण ,ऍड अनिल व्यवहारे, लक्ष्मण दासूद , सचिन बेंबडे , हाजी महमूद, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांच्यासह सभागृहात जेष्ठ सभासद तथा मार्गदर्शक प्रा नानासाहेब गाठाळ, प्राचार्य बी आय खडकभावी, दिनकर जोशी, डॉ आरसुडे, प्रा शांतीनाथ बनसोडे, प्रा. माणिकराव लोमटे,प्रा. बळीराम जोगदंड, प्रा. एस पी कुलकर्णी, मुझमील खतीब, संजय भोसले, महादेव आदमाणे, अमोल लोमटे, धम्मा सरवदे, दिनेश भराडिया,युवराज काळम पाटील रोटरी क्लब च्या अध्यक्षा रोहिणी पाठक, शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांच्यासह अनेक ग्राहक व सभासद उपस्थित होते .
आर्थिक वर्ष सन २०२४-२५ सालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात दीपप्रज्वलन व श्री योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर आर्थिक वर्षात दिवंगत झालेले नेते, देशभक्त, सैनिक, खेळाडू, विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती,बँकेचे सभासद, ठेवीदार ग्राहक यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर बँकेच्या सभासदांची विविध क्षेत्रात पदोन्नती तथा वेगवेगळ्या समित्यांवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे तसेच बँकेच्या सभासद व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल पाल्यांचे अभिनंदन केले. मागील आर्थिक वर्षाचा इतिवृत्त बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी सादर केला. तसेच वार्षिक सभेपुढील विषयांचे वाचन जेष्ठ संचालक ऍड विष्णुपंत सोळंके यांनी केले. यावेळी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर डॉ राजेश इंगोले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर उत्कृष्ट ग्राहक म्हणून देखील काही निवडक खातेदारांचा देखील सन्मान करण्यात आला.
आपले अध्यक्षीय भाषण व २०२४-२५ चा वार्षिक अहवाल सादर करताना बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने सन २०२४-२५ मधील केलेल्या उत्तम कामकाजामुळे व ग्राहकांच्या विश्वासामुळे ३१ मार्च २०२५ अखेर बँकेच्या ठेवी ५७३ कोटी झाल्या असून आजपर्यंत त्यात वाढ होऊन ६०० कोटींचा टप्पा पुर्ण केला आहे. यापुढेही असाच नवीन उच्चांक गाठण्याचा संकल्प बँकेच्या सर्व संचालक, सभासद व कर्मचारी वर्गाने घेतला आहे. अंबाजोगाई शहरातील केवळ एकट्या मुख्य शाखेत ४०हजार खातेदार असून सर्व शाखांतील ग्राहकांची संख्या ही १ लाखांपेक्षा जास्त आहे. मार्च २०२५ अखेर बँकेचे वसूल भागभांडवल हे रू १९ कोटी असून मागील वर्षाच्या तुलनेत रुपये ०१ कोटीची वाढ झालेली आहे.बँकेचा स्वनिधी हा रुपये ४५ कोटी असून त्यात मागिल वर्षीच्या तुलनेत ९.२६ % एवढी वाढ झाली आहे. राखीव निधी हा १४ कोटी ३४ लाख रुपये एवढा आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या नियमास आधीन राहून ग्राहकांना रु.३३० कोटी २ लाख रुपये एवढा कर्ज पुरवठा केला असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले. मार्च २०२५ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रु २८९ कोटी ११ लाख एवढी आहे . चालू वर्ष अखेरीस बँकेस करपसच्यात ४ कोटी ७१ लाखांचा नफा झाला असून बँकेच्या वतीने सभासदाना ९% घसघशीत असा लाभांश देण्याची घोषणा याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली. मागील आर्थिक वर्षात अंबाजोगाई पिपल्स बँकेस विविध पुरस्कार प्राप्त झाल्याचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राजकिशोर मोदी यांनी सांगितले. मार्च २०२५ च्या लेखा परीक्षण अहवालात प्रतिवर्षा प्रमाणे बँकेस “अ” दर्जा प्राप्त झाला असून बँकेची ही उंच भरारी पाहता बँकेचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच कर्जदार , ठेवीदार व सभासद यांच्या सांघिक कामगिरीमुळे बँकेस हे प्रगतीचे उद्दीष्ट साध्य करता आले असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
पुढे बोलताना अंबाजोगाई राजकिशोर मोदी यांनी सांगितले की पिपल्स बँक ही महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील अठरा शाखाबरोबरच दोन विस्तारित शाखांद्वारे ग्राहकांना सेवा पुरवीत आहे . या अठरा शाखांपैकी दहा शाखा या स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत असून बँकेने IT क्षेत्रात देखील ग्राहकांना तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी भरीव अशी कामगिरी केली आहे. डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून UPI, IMPS, RTGS , ATM द्वारे पैसे काढणे व भरणे याद्वारे ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी बँक सदैव प्रयत्नशील असल्याने मोदी यांनी यावेळी नमूद केले. मार्च २०२५ अखेरील बँकेची प्रगती ही बँकेच्या पुढील वाटचालीस नवीन उभारी देणारी असून बँकेच्या सभासदांनी व ग्राहकांनी बँकेवरील विश्वास कायम ठेवल्याची ही पावतीच असल्याचे राजकिशोर मोदी यांनी स्पष्ट केले. मार्च २०२६ पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेनुसार केज, निलंगा,आणि मुरुड याठिकाणच्या नूतन शाखेचा शुभारंभ करण्याचा मानस देखील या सभेत राजकिशोर मोदी यांनी बोलून दाखवला.
अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने केवळ अर्थकारणच न करता वेळोवेळी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेत असते. ज्यामध्ये शहरातील गुणिजनांचा सन्मान , रक्तदान शिबीर ,बँकिंग क्षेत्रात महिला जनजागृती अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामुळे व ग्राहकांसाठीच्या नवनवीन उपक्रमामुळे बँक ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरली असल्याचे समाधान बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.यापुढेही असेच सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतील असा संकल्प राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला .बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी बँकेचे अनेक सभासद , ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचलन प्रा. अनंत कांबळे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार ऍड विष्णुपंत सोळंके यांनी व्यक केले.


Categories

Recent Posts