Breaking
Updated: सप्टेंबर 12, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाईत : कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात बुधवारी (दि.10) घडली. याप्रकरणी पत्नीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कैलास सरवदे (वय 37, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे त्या मृत पतीचे नाव आहे. कैलासची बहिण ज्योती तरकसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या तक्रारीनुसार, कैलास सरवदे याचे लग्न सात वर्षांपूर्वी माया हिच्याशी झाले होते. माया हिचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पतीपासून तिला दोन मुली तर कैलासपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कैलास हा शरीराने अपंग आणि दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याच्यात व माया यांच्यात नेहमी वाद होत असत. माया ही कैलास याला नेहमी उपाशी ठेवत असे.
10 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कैलास हा दारू पिऊन घरी आल्यावर दोघांत पुन्हा वाद झाला. माया हिने संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरच्यांनी व शेजाऱ्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता माया हिने हस्तक्षेप करू नका, दररोज हा दारु पिवुन असाच करतो मी याला फुकट सांभाळायचे का असे म्हणत त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने कैलास घराशेजारी बेशुद्ध पडलेला दिसला.
नातेवाईकांनी त्याला ऑटोरिक्षाने सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरुवातीला मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाला असा समज होता. मात्र दुसऱ्या दिवशी 11 सप्टेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू मारहाणीत अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतींमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
या माहितीवरून कैलास याची पत्नी माया सरवदे हिने जाणूनबुजून पतीवर घातक मारहाण करून त्याचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीतून करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माया सरवदे हिच्यावर बीएनएस कलम 105 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय रविकुमार पवार करत आहेत.