Breaking
Updated: सप्टेंबर 3, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : तालुक्यातील मांडवा पठाण परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या डोंगराळ भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून अनेकांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शनही झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावातील पशुधनाचा अक्षरशः फडशा पाडला जात असून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
रात्रीच्या वेळी गावात व शिवारात बिबट्याचा संचार वाढल्याने गावात सामसूम पसरते. ग्रामस्थांची झोप उडाली असून लहान मुलांना घराबाहेर काढण्यासही पालक धजावत नाहीत. बिबट्याने आतापर्यंत गाई, बैल, वासरे, शेळ्या, घोडे, वगार यांसारख्या जनावरांचा फडशा पाडला आहे.
बिबट्याने फडशा पाडलेल्या जनावरांमध्ये बाबुराव देवराव रुद्राक्ष यांची गाय, बळीराम शिवदास आकुसकर यांचे दोन बैल, नवनाथ देवराव रुद्राक्ष यांचा बैल, संभाजी सखाहरी रुद्राक्ष यांची गाय, छाया संभाजी रुद्राक्ष यांचे वासरू, सचिन छत्रभुज जोगदंड यांची शेळी, गणपत सोपान जाधव यांची शेळी, सोमनाथ सखाहरी रुद्राक्ष यांचा वगार, बाजीराव तुकाराम घाडगे यांचा बैल, राहुल नारायण जोगदंड यांचा वगार, विनोद दादाराव जोगदंड यांचा बैल, गणेश मल्लिकार्जुन इरे यांचे दोन घोडे, नितीन रोहिदास जोगदंड यांचा कुत्रा आणि चंद्रकांत धोंडीराम चौरे यांचा वगार अशा जनावरांचा समावेश आहे. यामुळे सदरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वनविभागाकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांनी केला आहे. गावात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
सध्या मांडवा पठाण परिसरात रात्रीच्या वेळी भीतीचे वातावरण असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांतून होत आहे.