Breaking
Updated: सप्टेंबर 2, 2025
सुगाव येथील मराठासेवक नितीन चव्हाण यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – सुगाव येथील मराठासेवक नितीन माणिकराव चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर सुगाव येथे रविवारी शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पिडीत कुटुंबाला सांत्वनपर भेट दिल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना देशमुख यांनी सांगितले की, मराठासेवक नितीन चव्हाण यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलायला नको होते. नितीन यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे राजेसाहेब देशमुख म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या सध्या मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात केंद्र व राज्य सरकारची नकारात्मक भूमिका यामुळे लवकर तोडगा निघत नसल्याने व आमरण उपोषणामुळे दिवसेंदिवस मनोजदादा यांची प्रकृती ढासळत चालली असल्याचे टि.व्ही वर पाहून त्यांना अतिशय दु:ख झाले. तसेच सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत असलेली माहिती ऐकून त्यातून आलेल्या नैराश्यातून नितीन चव्हाण यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार, दिनांक ३० ऑगस्ट रोजी घडली. नितीन चव्हाण या तरूणाने मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. रविवारी चव्हाण यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात व हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख, सरपंच बंडू शिंदे, उपसरपंच गणी खाॅं पठाण, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सचिन शिंदे, व्हाईस चेअरमन नामदेव शिंदे, राजेभाऊ शिंदे, बलभीम शिंदे, रियाझ पटेल, शिवसेना (उबाठा) नेते मदनलाल परदेशी, दत्ता शिंदे, आस्तिक शिंदे, बब्रुवान पांडे, महेश शिंदे, बबन पवार, भाऊसाहेब शिंदे, युसुफ पटेल, धनराज टिळक, किशोर कण्णाडोणे, युसुफ पठाण, रौफ भाई, नंदकिशोर चव्हाण, जमील पठाण, काकासाहेब आरसुळ, दयानंद शिंदे, किशोर टेकाळे, माणिक शिंदे, सुलेमान पठाण, आकाश भागवत यांच्यासह गांवकरी व पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. मराठासेवक नितीन चव्हाण यांची आत्महत्या ही मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ झाली असल्याची माहिती चव्हाण कुटुंबियांच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी अंबाजोगाईचे तहसीलदार, तलाठी व पोलीसांना देण्यात आलेली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की, मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक आत्महत्या या मराठवाड्यातच झाल्या आहेत. बीड व्यतिरिक्त मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी असे सात जिल्हे आहेत. मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक आत्महत्या याच जिल्ह्यांमध्ये झालेल्या आहेत. मनोजदादा जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावातून मुंबई येथील आझाद मैदानावर पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करण्याचा सरकारला इशारा आणि पुर्वसुचना दिली होती. त्यानुसार २९ ऑगस्ट २०२५ पासून ‘मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण’ द्यावे. या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मी व आमच्या सहकाऱ्यांनी संघर्षयोध्दा दादांची मुंबईत जावून भेट घेतली. आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिला आहे. दिवसेंदिवस संपूर्ण महाराष्ट्रातून या आंदोलनाला व्यापक, सर्वव्यापी व उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. असे असताना मराठासेवक नितीन माणिकराव चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सध्या मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातून लवकर तोडगा निघत नसल्याने हताश होऊन व सततच्या आमरण उपोषणांमुळे दिवसेंदिवस मनोजदादा यांची प्रकृती ढासळत चालली असल्याचे टि.व्ही वर पाहून त्यांना अतिशय दु:ख झाले. व यातून आलेल्या नैराश्यातून नितीन यांनी आत्महत्या केली आहे. पण, नितीन यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलायला नको होते. नितीन यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे राजेसाहेब देशमुख म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनात आजपावेतो विविध वयोगटातील अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, युवक, शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, शेतकरी, उद्योजक, मराठा आंदोलक यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या सर्व आत्महत्यांमध्ये तीन गोष्टी स्पष्ट दिसून येतात. त्या म्हणजे मरण पावलेले सर्वजण मराठा समाजातील होते. विशेष म्हणजे ते मराठा आरक्षण आंदोलनात सामील झाले होते. त्यांच्यापैकी बहुतेकांची आर्थिक स्थिती खराब होती आणि त्यांच्यावर सततच्या नापिकीमुळे कर्ज ही होते. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या भविष्याबद्दल चिंतेत होता. परंतु, त्यांच्या मृत्यूनंतर काही कुटुंबांना शासनाकडून भरपाई मिळाली, काहींना केवळ आश्वासने, तर काहींना शासनाने दिलेले धनादेश ही बाऊन्स झाले आहेत. आरक्षण दिले. तर आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला नोकऱ्या मिळतील, असे या सर्व आत्महत्या करणाऱ्यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले. या सर्वांच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे. आरक्षण मिळाले असते. तर कदाचित नितीनसह ते सर्वजण आपल्यात असते. हे झोपलेले सरकार जागे होत नाही. यंत्रणा मराठा समाजाला, कुणब्यांना साथ देत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नितीन चव्हाण यांनी आत्महत्या केली. नितीन हे मराठा क्रांती मोर्चात एक स्वयंसेवक म्हणून ही सहभागी झाले होते. यापूर्वी आरक्षणासाठी झालेल्या अनेक मोर्चांमध्ये त्यांचा सहभाग होता. अंबासाखर कारखाना येथे झालेल्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सभेपासून नितीन हे दादांच्या नेतृत्वाने प्रभावीत झाले होते. पाटील यांच्या अनेक सभेला ते उपस्थित ही राहिले होते. जरांगे पाटील पुन्हा आझाद मैदानावर उपोषणाला बसल्याने नितीन यांना दु:ख झाले होते. व त्यातून हा दु:खद निर्णय घेतला असल्याचे बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.
मराठा आंदोलकांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये :
मराठा समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले संघर्षयोध्दा मनोजदादा यांनी त्यांचे जीवन पणाला लावले आहे. त्यामुळे कुणीही मराठा आंदोलकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, या आंदोलनाला सर्व मराठा समाजासह मुस्लिम, ख्रिश्चन समाज बांधव व आंबेडकरी चळवळीतील मान्यवर नेते व पक्ष, इतर पक्ष आणि संघटना यांनी ही पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल सर्वंचे आभार. दिवसेंदिवस वाढता पाठिंबा पाहता, आपल्याला यश येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मराठा समाजाने आंदोलने करावीत, आपला पाठिंबा वाढवावा मात्र, आंदोलनाला गालबोट लागेल, असे काहीही करू नये, तसेच कोणीही उग्र आंदोलन करू नये.
~ राजेसाहेब देशमुख
(राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)