बहराइच (उत्तर प्रदेश) : मातेच्या मायेपुढे निसर्गातील भीषण प्राण्याची ताकदही कमी पडली. बहराइच जिल्ह्यातील एका घटनेने हे पुन्हा सिद्ध केले आहे. अवघ्या पाच वर्षांच्या मुलाला मगर ओढून नेत असताना त्याच्या आईने जीवाची पर्वा न करता मगराशी थेट हाताने झुंज दिली आणि आपल्या लेकराचे प्राण वाचवले.
वीरू नावाचा पाच वर्षीय बालक घराजवळील नाल्याशेजारी खेळत असताना अचानक पाण्यातून मगर बाहेर आली आणि त्याला जबड्यात पकडून पाण्यात खेचू लागली. त्याच क्षणी वीरूच्या किंकाळ्या ऐकून त्याची आई माया (४०) घटनास्थळी धावली. तिने क्षणाचाही विलंब न करता थेट पाण्यात उडी घेतली आणि आपल्या मुलाला सोडवण्यासाठी मगराशी सामना सुरू केला.
डोळ्यांतून धडधडणाऱ्या भीतीकडे दुर्लक्ष करून मायाने मगराला हाताने झुंज दिली. तिने हाताने ओढले, नखांनी ओरबाडले, लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. तरीसुद्धा मगर मुलाला सोडण्यास तयार नव्हती. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार आई व मगरामध्ये तब्बल पाच मिनिटे जीवावर उदार होऊन संघर्ष सुरू होता. शेवटी मायाने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि मगरीच्या अंगावर वार केला. या जोरदार प्रहारानंतर मगराने अखेर वीरूला सोडून दिले.
“मी काही क्षणही विचार केला नाही. फक्त मुलाचा जीव वाचवायचा एवढाच विचार मनात होता. मी सर्व शक्तीनिशी झुंज दिली. शेवटी देवाच्या कृपेने माझा मुलगा वाचला,” असे माया यांनी सांगितले.
या संघर्षात माया आणि वीरू दोघे जखमी झाले आहेत. मायाला सौम्य दुखापती झाल्या असून उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले. मात्र वीरू गंभीर जखमी असल्याने तो रुग्णालयात उपचार घेत आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी ग्रामप्रमुख राजकुमार सिंह यांनी प्रशासनाला कळवले. तत्काळ वनविभागाचे विभागीय वनअधिकारी राम सिंह यादव आणि एसडीओ रशीद जमीळ यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यादव यांनी या परिसरात विशेष मोहीम राबवून मगरीला पकडण्याचे आश्वासन दिले.
ही घटना ऐकून गावकऱ्यांनी मायाच्या धाडसाचे कौतुक केले असून “आई म्हणजे जिवंत देवी” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.