केज – शेत नांगरणीचे पैसे मागितल्यावरून एका ट्रॅक्टर चालकास तिघांनी लोखंडी टॉमीने पाठीवर व बरगडीवर मारहाण करून जखमी केल्याची घटना बेलगाव (ता. केज) येथे घडली.
बेलगाव येथील रामेश्वर महादेव चौरे या तरुणाने मागील महिन्यात मल्हारी देवीदास चौरे याच्या बटरीने केलेले ६ एकर शेत नांगरून दिले होते. १७ मे रोजी सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान शेतात जाऊन नांगरलेल्या शेताची मोजणी केल्यानंतर नांगरणीचे ९ हजार सहाशे रुपये होतात, असे सांगून या पैशाची मागणी केली.
त्यावर मल्हारी चौरे हे तुझे तेवढे पैसे होत नाहीत, असे म्हणाल्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. तेवढ्यात केशव देवीदास चौरे व रवींद्र जनार्धन चौरे या दोघांनी येऊन तु कशाचे पैसे मागत आहेस, असे म्हणत शिवीगाळ करीत दोघांनी त्यांना पकडले. मल्हारी चौरे याने लोखंडी टॉमीने रामेश्वर चौरे यांच्या पाठीवर व बरगडीवर मारहाण करून जखमी केले.
त्यांच्यावर केज येथील प्रथमोपचार करून पुढील उपचार अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर २३ मे रोजी दिलेल्या तक्रारीवरून मल्हारी चौरे, केशव चौरे, रवींद्र चौरे या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार बाबासाहेब बांगर हे करीत आहेत.