अंबाजोगाई: प्रधानमंत्री आवास घरकुल योजना (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांचे गावपातळीवर सर्वेक्षण सध्या सुरू असून, केंद्र सरकारने या सर्वेक्षणासाठी ३१ मे ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. मात्र, ऑनलाइन सर्वेक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या अधिकृत पोर्टलचा सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने अनेक पात्र नागरिकांना आपली नोंदणी व माहिती सादर करता आलेली नाही. तसेच सेल्फ सर्वेक्षण होत नसल्याने अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
लाभार्थी नाराज: तांत्रिक अडचण सोडवीण्याची मागणी
अंबाजोगाई तालुक्यात ९९ ग्रामपंचायतींतर्गत १५ मे अखेर ३ हजार ३३२ लाभार्थ्यांचे सर्वेक्षण झाले आहे. केंद्र शासनाने १ एप्रिल २०२४ पासून ग्रामीण भागातील बेघर लाभार्थ्यांना आणि पूर्वीच्या यादीत समावेश नसलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा दोन अंतर्गत नव्याने सर्वेक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यासाठी पंचायत समिती स्तरावरून गावनिहाय ग्रामपंचायतींना सर्वेक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत सर्वच स्तरावर तांत्रिक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वेक्षण प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.
अनेक गावांमध्ये संबंधित लाभार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहूनही माहिती अपलोड न होऊ शकल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सर्व्हर डाऊनचा प्रश्न गेले काही दिवस सातत्याने जाणवत असून, स्थानिक कर्मचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान या संदर्भात माहिती घेण्यााठी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
तालुक्यात ३ हजार ३३२ लाभार्थ्यांचे सर्वेक्षण
तालुक्यात ९९ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून कार्यवाही केली जात आहे.
अनेकांना घरकुलाचा लाभमिळाला आहे. आता नव्याने घरकुलाचे सर्वेक्षण 3 केले जात असून, अद्यापपर्यंत ३ हजार ३३२ लाभार्थ्यांचे सर्वेक्षण झाले असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लाभार्थी वंचित राहण्याची भित्ती
अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे सर्वेक्षण अद्यापही झालेले नाही. त्यात सर्व्हरचा अडथळा निर्माण होत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. शासनाने यात तत्काळ लक्ष घालून पोर्टलमधील तांत्रिक बिघाड दूर करावा आणि सर्वेक्षणासाठी ३१ मे पर्यंत मुदत वाढ दिली असली तरी तांत्रिक दोष दूर न केल्यास अनेक गरजूंना या महत्त्वाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
“मागील काही दिवसांपासून सर्वर चालत नसल्याने सर्वेक्षण करतांना अडचणी येत आहेत. सर्वेक्षण काम संथ गतीने होत आहे. अनेक लाभार्थी सेल्फ सर्वेक्षण करत आहेत, मात्र त्या अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासनाने त्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात.”