Breaking

विधानभवनातील गोंधळ प्रकरणावर पडळकरांची माफी, आव्हाडांचा संताप : काय घडलं?

Updated: July 17, 2025

By Vivek Sindhu

new project 2025 07 16t1733116551752667342

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

मुंबई : विधानभवन परिसरात झालेल्या धक्कादायक गोंधळानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारीमुळे वातावरण चांगलेच तापले. या प्रकारानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही आमदारांना बोलावून घेत चर्चा केली.

यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. “विधानसभेच्या परिसरात जे घडलं, ते अतिशय दुर्दैवी आहे. मला याचा खूप दुःख आहे. मी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो,” असे पडळकर म्हणाले. मात्र यापुढे बोलणे टाळत त्यांनी सांगितले की, “वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यावरच मी पुढील प्रतिक्रिया देईन.”

नेमकं काय घडलं?
विधानभवनाच्या पायऱ्या चढत असताना गोपीचंद पडळकर यांचे समर्थक हृषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांच्यात जोरदार मारामारी झाली. या वेळी गोपीचंद पडळकर स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. दुसरीकडे, सभागृहात जितेंद्र आव्हाड कालच्या विधानभवनात झालेल्या अपशब्दांच्या घटनेवर भाष्य करत होते. याच दरम्यान रोहित पवार आणि सना मलिक यांनीही या गोंधळाची माहिती सभागृहात दिली.

घटनेनंतर जितेंद्र आव्हाड माध्यमांसमोर येऊन संतप्त प्रतिक्रिया दिली. तर सभागृहात भाजप नेते आशिष शेलार यांनीही याची सविस्तर माहिती दिली आणि अध्यक्षांनी याबाबत अहवाल मागवला आहे.

पडळकरांची माफी, आव्हाडांचा संताप व्यक्त
या सगळ्या प्रकारानंतर मंत्री बावनकुळे यांनी दोन्ही आमदारांना बोलावून घेतले. सुरक्षा रक्षकांनी दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवले. यानंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली. पडळकर यांनी पुन्हा विधीमंडळात येऊन बावनकुळे यांच्यासोबत चर्चा केली आणि दिलगिरी व्यक्त करत सभागृहातून बाहेर पडले.

जितेंद्र आव्हाड यांनी मात्र यावर तीव्र संताप व्यक्त केला. “विधानसभेत जर गुंडांना प्रवेश असेल आणि आमदारांवर हल्ले होत असतील तर आमच्या सुरक्षिततेचं काय? मला आई-बहीण यांच्यावरून अश्लील शिवीगाळ झाली आहे. बाहेर आलो होतो, मोकळी हवा खायला, हे सगळे मला मारण्यासाठीच आले होते. विधानभवनात आमदार सुरक्षित नाहीत, तर कशाला आमदार म्हणून राहायचं?” असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

तसंच सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत ते म्हणाले, “आई-बहीण वरून शिव्या देणाऱ्याला पार्लमेंटरी शब्द करा, असा मुजोरपणा चालतो का? हा सत्तेचा माज आहे,” असे संतप्त शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सध्या या प्रकरणावर विधानसभेच्या अध्यक्षांकडून अहवाल मागवण्यात आला असून पुढील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे.