मस्साजोग गावाचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला बीड जिल्हा कारागृहातून नाशिक येथील कारागृहात हलवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बीड कारागृहात त्याच्या जीवाला धोका असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, बीड कारागृहात गीते गँग व कराड गँग यांच्यात मागील काळात वाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गँगवॉर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अक्षय आठवले टोळीबरोबर कराडचा वाद उफाळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून त्याची रवानगी नाशिकला केली जात असल्याची माहिती आहे.

इतर आरोपी बीड कारागृहातच

सदर प्रकरणात कराडसह सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे आणि महेश केदार हे इतर आरोपी सध्या बीड कारागृहात आहेत. तथापि, कराडच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे फक्त त्याची रवानगी नाशिकला केली जात आहे.

गित्तेने दिला होता इशारा

काही महिन्यापूर्वी वाल्मीक कराड याच्यावर कारागृहात हल्ला झाल्याचे समोर आले होते. यानंतर वाल्मीक कराडवर झालेल्या हल्ल्यानंतर शशिकांत ऊर्फ बबन गीते याच्या पोस्टमधून वाल्मीक कराड याला इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘अंदर मारना या मरना सबकुछ माफ है’असे म्हटले आहे. बबन गित्ते याच्या या पोस्टनंतर बीडमध्ये टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कराडवर हल्ला करणारा महादेव गित्ते कोण?

महादेव उद्धव गित्ते (34) हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी बबन गित्ते यांचा कार्यकर्ता आहे. तो सध्या सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात बीड जिल्हा कारागृहात बंदिस्त आहे. 29 जून 2024 दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 च्या सुमारास महादेव गित्ते याच्या घरावर गोळीबार झाला होता. या हल्ल्यात हल्ला करण्यासाठी आलेला बापू आंधळे ठार झाला होता. हा हल्ला वाल्मीक कराडच्या इशाऱ्यानुसार झाल्याचा त्याचा दावा आहे.

अक्षय आठवले हा आठवले गँगचा सदस्य

वाल्मीक कराडवर धावून जाणारा अक्षय आठवले हा बीडमधील कुख्यात आठवले गँगचा म्होरक्या आहे. या गँगच्या सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सनी आठवले हा या गँगचा म्होरक्या आहे. अक्षय हा त्याचा भाऊ आहे.