Breaking

आ.प्रसाद लाड यांचा एआयद्वारे खोटा आवाज, खोटी सही करत 3 कोटींचा घोटाळा

Updated: July 2, 2025

By Vivek Sindhu

आ.प्रसाद लाड यांचा एआयद्वारे खोटा आवाज, खोटी सही करत 3 कोटींचा घोटाळा

WhatsApp Group

Join Now

बीड – भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बनावट लेटरहेड आणि खोट्या सह्या वापरून तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही माहिती स्वतः आमदार लाड यांनी विधान परिषदेच्या सभागृहात दिली आहे.

रत्नागिरी येथील अधिकार्‍यांना प्रसाद लाड यांच्या आवाजात बनावट -ख कॉल करून निधी तातडीने वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी वर्ग करण्यात आला. या प्रकारात लाड यांच्या नावाचा खोटा लेटरहेड आणि सही वापरण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

बीड जिल्हा गेल्या वर्षभरापासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर येथे वाढलेली गुन्हेगारी आणि विविध घोटाळ्यांनी जिल्ह्याची प्रतिमा धुळीस मिळवली आहे. आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आला असून, आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचा गैरवापर करत तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांचा निधी फसवणूक करून वर्ग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणात 4 जणांची नावे समोर आली असून अधिक तपास सुरू आहे. रत्नागिरीतील अधिकार्‍याला या व्यवहाराबाबत संशय आल्यावर त्यांनी आमदार लाड यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधला. संभाषणादरम्यान लाड यांनी कोणतीही अधिकृत विनंती केली नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर ही बनावट पत्रव्यवहार आणि -ख कॉलद्वारे झालेली फसवणूक उघडकीस आली.
एआयचा वापर करत मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजता आलेल्या कॉलमध्ये निधीच्या संदर्भात चर्चा झाली होती. त्या कॉलसह आमदार प्रसाद लाड यांच्या लेटरहेडवरील सहीसुद्धा बनावट होती.

त्यांच्या नावाचा गैरवापर करून निधी चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे लाड यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी सायन पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून, पोलिस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांनाही ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे, या प्रकरणात बीड जिल्ह्याचे नाव समोर आल्यावर ते अधिक सतर्क झाले होते, असेही लाड म्हणाले. तपासादरम्यान काही फोन नंबर आणि चार व्यक्तींची नावे समोर आली असून, त्यातील एका आरोपीचे नाव बंडू असल्याची आणि तो सरपंच असल्याची प्राथमिक माहिती आहे. लवकरच पोलिस सर्व माहिती घेऊन योग्य ती कारवाई करतील, असा विश्वास आमदार लाड यांनी व्यक्त केला.