Breaking
WhatsApp Group
Join Nowमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मान पत्र देऊन कार्याचा गौरव
बीड जिल्ह्यातील कारावास भोगलेल्या 57 ज्येष्ठांचा सन्मान
बीड – लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी झटलेल्या सर्व जुन्या पिढीचा इतिहास नवीन पिढीला दिशादर्शक आहे. आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या सर्व ज्येष्ठांच्या पाठिशी शासन खंबीरपणे सोबत आहे. आपणास पात्र असलेल्या सर्व सेवा प्रशासनाकडून तत्परतेने देण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज उपस्थितांना दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीच्या काळात लोकशाहीकरिता लढा देताना सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेल्या बीड जिल्ह्यातील 57 जणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी असलेले सन्मान पत्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याहस्ते आज सन्मानपूर्वक देण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवशंकर स्वामी, कारावास भोगलेले विजयकुमार पालसिंगलकर आदींची मंचावर उपस्थिती होती.
1975 ते 1977 काळात लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मुल्याच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीत निडरपणे उभे राहिलात. आपण हुकुमशाहीचा धाडसाने प्रतिकार करून, कारावास स्वीकारून स्वातंत्र्य अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी संघर्ष केला. देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या या लढ्यातील आपल्या योगदानाचा आम्ही अभिमानाने गौरव करीत आहोत. हे सन्मान पत्र आपल्या त्याग, धैर्य आणि दृढतेला सलाम करण्यासाठी आहे. आपण आपल्या कृतीतून विचारांतून आणि त्यागातून नव्या पिढीसमोर लोकशाही मुल्यांचा आदर्श ठेवला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मान पत्रात नमूद केले आहे.
प्रातिनिधिक स्वरूपात श्री. पालसिंगलकर, कुसुम सरवदे, उद्धव नागरगोजे, नारायण पांडे, दिलीप सोनवळकर, श्रीमती संजीवनी जोगदंड यांना जिल्हाधिकारी जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान पत्र देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. तसेच उपस्थित सर्वांचे आभार मानले.
Last Updated: June 25, 2025