Breaking
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई : तालुक्यातील खापरटोन शिवारात अज्ञात चोरट्यांनी पोल्ट्री शेडमधून एकूण ४ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या शेळ्या, बोकड व पिल्ले चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बालाजी मुरलीधर फड यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या कुटुंबासह खापरटोन येथे राहतात. त्यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असून त्यांच्या ताब्यात ३८ शेळ्या, २ बोकड व १५ पिल्ले होती. तसेच त्यांच्या लहान भावाकडे ८ शेळ्या आणि ७ पिल्ले असा एकूण १५ शेळ्यांचा संच होता. दोघांनी मिळून खापरटोन शिवारातील संतोष व मोतीराम त्रिंबक फड यांच्या पोल्ट्री शेडचा वापर शेळ्या बांधण्यासाठी केला होता.
दि. २१ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पावसाच्या पार्श्वभूमीवर शेळ्या शेडमध्ये सुरक्षित ठेवल्या व दोन्ही गेट कुलूप लावून चाव्या स्वतःकडे ठेवल्या. रात्री दोघेही शेतीतील हॉटेलमध्ये झोपले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी २२ जून रोजी सकाळी ६ वाजता शेडकडे गेल्यावर गेटचे कुलूप तुटलेले व मागील जाळी फाटलेली आढळली. आत तपासणी केली असता एकूण ४८ शेळ्या-बोकड व २२ पिल्ले चोरीला गेल्याचे उघड झाले. चोरी गेलेल्या शेळ्यांची अंदाजित किमत ४ लाख ७२ हजार रुपये असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Last Updated: June 23, 2025