Breaking
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई तालुक्यात पंधरा दिवसांची मोहीम; शिक्षक लागले कामाला
अंबाजोगाई – तालुक्यातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे १ ते १५ जुलै या पंधरवड्यादरम्यान विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळां बरोबरच खाजगी शाळांमधील शिक्षक कामाला लागले आहेत. गेल्या वर्षी शहरासह तालुक्यात तुरळक शाळाबाह्य मुल सापडले होते. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व बालकांना शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या मोहिमेंतर्गत प्रत्येक शिक्षकाला आपापल्या क्षेत्रात जाऊन शाळाबाह्य, स्थलांतरित, काम करणारी मुले, अनाथ व विशेष मुलांची यादी तयार करायची आहे. ही माहिती सर्वेक्षण फॉर्मद्वारे संकलित करून शासकीय पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासाठी पूर्वतयारी पूर्ण केली आहे.
शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एकही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, असा या उपक्रमाचा उद्देश आहे त्यासाठी सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. मुलाचे नाव, वय, पालकांची माहिती, सध्याचा शिक्षणाचा दर्जा, विशेष गरजा असलेल्या मुलांचे तपशील व स्थलांतराचा इतिहास आदींची माहिती संबंधित शिक्षक संकलीत करीत आहेत.
३ ते ६ वर्षे वयोगटातील मुले तसेच ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व बालकांच्या सर्वेक्षणाचा यात समावेश राहणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या ‘दखल’ प्रणालीवर ही माहिती ‘अपलोड’ करण्यात येईल. या माहितीच्या आधारे पुढील शैक्षणिक धोरणे ठरविण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार येथील शिक्षण विभागाने केला आहे.
नजीकच्या शाळेत प्रवेश
शालेय परिसरात घरोघरी जाऊन बसस्थानक, खानावळी, रेल्वेस्थानक, सार्वजनिक बाजारपेठ, वीट भट्या, दगड खाणी, छोटे छोटे कारखाने आदी ठिकाणी बालमजूर असण्याची शक्यता असते. याशिवाय लहान मोठ्या वस्त्या, वाडे-तांडे, पाडे, शेतमळे व जंगलात अशा सर्व ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या शाळाबाह्य व स्थलांतरित बालकांना त्यांच्या घराजवळच्या शाळेत त्यांच्या वयानुसार प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी संबंधित पालकांना एक रुपया देखील खर्च करावा लागणार नाही.
यांचा असणार सहभाग
या सर्वेक्षण मोहिमेत समाजकल्याण विभागासह महसूल, आदिवासी विभाग, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग, नगरपालिका आदी विभागांच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील जवाबदारी पंचायत समितीकडे सोपविण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या शाळासह खाजगी शाळेतील शिक्षकांनी शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे सुरु केले आहे. गटशिक्षणाधिकारी मधुकर सुवर्णकार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिक्षक शाळाबाह्य मुलांचा सर्व करीत आहेत.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथवा टिकवून ठेवण्यासाठी हा सर्वे केला जात आहे. समाजातील सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
– रामभाऊ पवार (केंद्रप्रमुख, केंद्र आपेगाव)
Last Updated: July 5, 2025