Breaking
WhatsApp Group
Join Nowपरळी तालुक्यात संपादन प्रक्रिया रोखली
परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध दर्शवला असून, संपादन प्रक्रियेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना तीव्र विरोध करत माघारी पाठवले. या विरोधामुळे तालुक्यातील संपादन प्रक्रिया सध्या पूर्णतः ठप्प झाली आहे.
कृषीदिनी, परळी तालुक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांनी तळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करत शासनाच्या प्रस्तावित महामार्गाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. शेतकऱ्यांचा स्पष्ट आग्रह आहे की हा महामार्ग तात्काळ रद्द करण्यात यावा.
राज्य शासन व प्रशासन सीमांकन आणि जमीन संपादनासाठी खोट्या आश्वासनांचा आधार घेत आहे. त्याचबरोबर पोलिसी दबावाचा वापर करून शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आता शेतकरी या दडपशाहीला बळी न पडता एकवटले आहेत आणि प्रकल्पाच्या विरोधात ठामपणे उभे आहेत.
शनिवार, ५ जुलै रोजी भोपळा, डाबी, कण्हेरवाडी तांडा येथे जमिनीच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विरोध दर्शवला. जमिनीची मोजणी थांबवली आणि स्पष्ट केला की, त्यांच्या वडिलोपार्जित शेतीला कुठल्याही परिस्थितीत ते हात लावू देणार नाहीत. कण्हेरवाडी तांडा येथे झालेल्या बैठकीत या भूमिकेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीस किसान सभेचे अॅड. अजय बुरांडे, व्यंकट ढाकणे, कॉ. प्रकाश चव्हाण, राहुल मुंडे, सुग्रीव फुंदे, माणिक सोनवणे, गणेश सोनवणे, ओम मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी एकमुखाने शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला.
दरम्यान, मोजणीसाठी आलेले उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अरविंद लाटकर यांनाही शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. अखेरीस त्यांनी शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा पंचनामा करत कार्यस्थळ सोडले.
Last Updated: July 5, 2025