Breaking
WhatsApp Group
Join Now२५ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण सोहळा
अंबाजोगाई -: येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांना २०२५ -२०२६ या वर्षीचा रोटरी भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता हॉटेल परिचय येथे भावी प्रांतपाल जयेश पटेल यांच्या उपस्थितीत होणार आहे.अशी माहिती रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा रोहिणी पाठक,सचिव मंजुषा जोशी यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना “रोटरी भूषण” या पुरस्काराचे वितरण केले जाते.यावर्षी हा पुरस्कार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.बी.आय.खडकभावी यांना देण्याचा निर्णय क्लबच्या बैठकीत घेण्यात आला.
अंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेरघर आहे.येथे तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणीत डॉ.बी.आय.खडकभावी यांचा मोठा वाटा आहे.गेल्या ४० वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून शिक्षण क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख आहे. अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागात तंत्र शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला त्यांनी नवी कलाटणी दिली.
अंबाजोगाईच्या शिक्षण क्षेत्रात जेव्हा तंत्रशिक्षणाची उणीव होती. त्याच काळात ४० वर्षापूर्वी कर्नाटकातून बी.आय.खडकभावी हे तंत्रशिक्षक म्हणून अंबाजोगाईत रुजू झाले. व अंबाजोगाईकरांच्या मनात स्थान निर्माण करून राहिले. त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने शिक्षण क्षेत्रात नवी ओळख
निर्माण केली. ग्रामीण भागातील ५ हजारांपेक्षा जास्त मुलींना अभियांत्रिकीचे शिक्षण देऊन खऱ्या अर्थाने ते महिला सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते ठरले आहेत. अंबाजोगाईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची ओळख त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला गुणवत्तेतून करून दिली. शिस्तप्रिय व विद्यार्थी प्रिय प्राचार्य, उत्तम प्रशासक, अशी त्यांची ख्याती आहे. खडकभावी हे बाबू सर या नावानेच अंबाजोगाईत लोकप्रिय ठरलेले आहेत.त्यांनी समाजाशी असणारी बांधिलकी कधीही तुटू दिली नाही.
अंबाजोगाईच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीने त्यांना रोटरी भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.
Last Updated: July 7, 2025