Breaking
WhatsApp Group
Join Nowभर रस्त्यात हळद, कुंकू, लिंबू टाकून कोंबड्याचा दिला बळी; एकावर गुन्हा
परळी : परळी शहरात सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली असताना, या धार्मिक मिरवणुकीनंतर अघोरी प्रथा व जादूटोणासारखे कृत्य झाल्याचा आरोप करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बालाजी रानबा ढगे (वय ४१, रा. रामनगर, परळी वैजनाथ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ४ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास परळी शहरातील लक्ष्मी टॉवर परिसरात देवीच्या मिरवणुकी नंतर दिपक देशमुख (रा. गणेशपार, परळी) यांनी नागलीची पाने, हळद, कुंकू, लिंबू रस्त्यावर टाकून कोंबड्याची बळी देत रक्त रस्त्याच्या मधोमध सांडले. या अघोरी प्रकारामुळे परिसरात भीतीचे व अंधश्रद्धेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ढगे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेच्या वेळी ढगे यांच्यासोबत अं.नि.स.चे सदस्य सुकेशिनी नाईकवाडे, विकास वाघमारे, प्रा. दासू वाघमारे, रानबा गायकवाड हेही उपस्थित होते. त्यांनी हा प्रकार थेट अंधश्रद्धा व अघोरी प्रथांचे जाहीर प्रदर्शन असल्याचे म्हटले असून, समाजात अशा प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ढगे यांच्या तक्रारीवरून दीपक देशमुख याच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Last Updated: July 5, 2025