बीड – राज्यात गाजलेल्या बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेटप्रकरणी सीआयडी आणि बीड पोलिसांनी केलेल्या तपासावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
ज्ञानराधासह सर्वच मल्टिस्टेटप्रकरणी आता पत्रव्यवहार करू नका, तर मला थेट रिझल्ट द्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सीआयडी, बीड पोलिस, सहकार विभागाला खडे बोल सूनावले. विशेष पथक नेमून फरार अर्चना कुटे व इतर आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश फडणवीस यांनी सोमवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत दिले.
जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये ठेवीदारांच्या ३७१५ कोटींहून अधिकच्या ठेवी अडकल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी विधानभवनात ज्ञानराधासह दिवाळखोरीत निघालेल्या मल्टिस्टेटप्रकरणी बैठक घेण्यात आली.
या वेळी मंत्री पंकजा मुंडे, आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. विजयसिंह पंडित, आ. बबनराव लोणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, एसडीएम कविता जाधव, ठेवीदार संघर्ष कृती समितीचे मुख्य प्रवर्तक सचिन उबाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. ज्ञानराधाच्या संचालकांच्या २३८ मालमत्ता अद्यापही जप्त केलेल्या नसल्याचे निदर्शनास आले असून या मालमत्ता तातडीने जप्त करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.
त्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. बीड जिल्ह्यात ज्ञानराधासह इतरही मल्टिस्टेट सोसायट्यांकडून ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकत्रित बैठक घेऊन अहवाल द्यावा, फसवणूक झालेल्या ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी ही कार्यवाही आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.
सर्वच मल्टिस्टेट प्रकरणांत आरोपींची मालमत्ता जप्त करुन त्याचा लिलाव करुन पैसे ठेवीदारांना देण्यात यावेत, यासाठीची प्रक्रिया प्रशासनाने गतीने करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. नागरिकांना लवकर न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.