Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

सावकारी जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; दिंद्रुड पोलीस ठाण्यात नातेवाईकांचे प्रेत ठेवून ठिय्या आंदोलन

Updated: फेब्रुवारी 21, 2026

By Vivek Sindhu

bedcrime 2026021649572

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर: सावकारी पाशातून सुटका न झाल्याने आणि सावकारांकडून होणाऱ्या सततच्या मानहानीला कंटाळून गावंदरा येथील २२ वर्षीय तरुण धर्मराज अर्जुन बडे याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी आरोपींवर तातडीने कारवाई व्हावी या मागणीसाठी नातेवाईकांनी मयताचे प्रेत चक्क दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवल्याने तब्बल पाच तास परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची अधिक माहिती अशी की, धर्मराज बडे याच्या आई-वडिलांनी गावातीलच सावकार बालासाहेब कांबळे आणि त्याची पत्नी कौंताबाई कांबळे यांच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी हे सावकार दाम्पत्य धर्मराजसह त्याची आई संगीता आणि वडील अर्जुन बडे यांना सतत अश्लील भाषेत शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते. या त्रासाला वैतागून पीडित कुटुंब गुरुवारी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, तिथे घागरवाडा येथील भागवत अनुरथ वेताळ याने त्यांना अडवले. गुन्हा नोंद केल्यास तुमच्यावरही गंभीर गुन्हे दाखल करू, अशी धमकी भागवतने दिली. सावकारांचा जाच आणि त्यातच मिळालेली धमकी यामुळे प्रचंड मानसिक दबावाखाली असलेल्या धर्मराजने पालखी महामार्गावरील कारी शिवारात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.

शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईक आक्रमक झाले. अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन पार पडल्यानंतर, नातेवाईकांनी रात्री साडेसात वाजता धर्मराजचे प्रेत थेट दिंद्रुड पोलीस ठाण्यात आणले. दोषींवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली. रात्री बारा वाजेनंतर शोकाकुल वातावरणात धर्मराजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलमान शेख करत आहेत.


Categories

Recent Posts