Breaking

योगेश्वर कृष्णाच्या जीवनप्रसंगांनी उजळले स्नेहसंमेलनाचे व्यासपीठ; भक्ती, कला आणि संस्कार यांचा संगम

Updated: डिसेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

भक्ती, कला आणि संस्कार यांचा संगम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबेजोगाई (प्रतिनिधी): – येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये २४ डिसेंबर २०२५ रोजी ‘कृष्ण कथायें’ या संकल्पनेवर आधारित भव्य वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनप्रवासातील विविध प्रसंगांमधून भक्ती, कला आणि संस्कारांचा त्रिवेणी संगम या व्यासपीठावर पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून भारतीय संस्कृती आणि मूल्यांचा प्रभावी संदेश देत उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्याचे मुख्य पाहुणे म्हणून लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे उपस्थित होते. तर मान्यवर पाहुणे म्हणून विनायक कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष चंद्रकांत गित्ते आणि अंबेजोगाईचे गटशिक्षणाधिकारी (BEO) मधुकर सुवर्णकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य किर्तीकुमार देशमुख होते, तर लातूर हबचे जनरल मॅनेजर प्रसाद पोंक्षे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. दीपप्रज्वलन आणि सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर शाळेचा वार्षिक प्रगती अहवाल व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाट्यदृश्ये आणि नृत्ये होती. यामध्ये कृष्ण जन्म, माखनचोरी, गोवर्धन पर्वत उचलणे, रासलीला, कंसवध आणि सुदामा-कृष्ण मैत्री यांसारख्या प्रसंगांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ‘गो गो गोविंदा’ आणि ‘राधे राधे’ या गाण्यांवरील नृत्यांना पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. विशेष म्हणजे, पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केलेल्या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य किर्तीकुमार देशमुख यांनी विद्यार्थ्यांप्रती असलेली आपली निष्ठा व्यक्त केली. भगवद्गीतेतील श्लोकाचा संदर्भ देत त्यांनी आपली शाळा आणि विद्यार्थी हाच आपला धर्म असल्याचे नमूद केले. नवीन पिढीला गीतेच्या मूल्यांशी जोडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य पाहुणे डॉ. महादेव गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेतील प्रभुत्वाचे आणि सादरीकरणातील आत्मविश्वासाचे विशेष कौतुक केले. प्राचार्य देशमुख यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळेच असा दर्जेदार कार्यक्रम शक्य झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अशा सांस्कृतिक उपक्रमांच्या महत्त्वावर भर दिला. यातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ कलागुणच विकसित होत नाहीत, तर त्यांच्यात आत्मविश्वास आणि सर्जनशीलताही वाढीस लागते, असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Categories

Recent Posts