Breaking
Updated: एप्रिल 3, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: भारतीय शास्त्रीय संगीत आणि वारकरी परंपरेचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचवणारे ख्यातनाम पखवाज वादक पंडित उद्धव बापू आपेगावकर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा १३ वा ‘लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. रविवारी, १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता जालना रोडवरील लोकमत भवन येथील लोकमत लॉन्सवर आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा यांनी पत्राद्वारे या सन्मानाची घोषणा केली असून, पंडित आपेगावकर यांच्या सांगीतिक तपस्येचा हा गौरव ठरणार आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव या मूळ गावचे रहिवासी असलेले पंडित उद्धव बापू आपेगावकर यांना पखवाज वादनाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. पद्मश्री दिवंगत शंकर बापू आपेगावकर यांचे ते सुपुत्र आणि पट्टशिष्य असून, त्यांनी आपल्या वडिलांची शास्त्रशुद्ध वादनाची परंपरा समर्थपणे पुढे चालवली आहे. केवळ पारंपरिक वारकरी पखवाज वादनापुरते मर्यादित न राहता, त्यांनी पखवाजाला फ्युजन संगीतातही एक मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या या अष्टपैलू सांगीतिक योगदानामुळेच त्यांना ‘मृदंगमहर्षी’ या पदवीने गौरवले जाते.
पंडित आपेगावकर यांनी आपल्या वादनाच्या जोरावर केवळ भारतच नव्हे, तर इंग्लंड, अमेरिका, बेल्जियम आणि नेदरलँड्स यांसारख्या देशांमध्येही भारतीय संगीताची मोहोर उमटवली आहे. लंडनच्या जगप्रसिद्ध ‘ऑपेरा हाऊस’मध्ये कार्यक्रम सादर करण्याचा बहुमान त्यांना मिळाला असून, ते अनेक परदेशी कलाकारांसोबत फ्युजन मैफली आणि कार्यशाळांचे आयोजनही करतात. धृपद गायकी, सूफी संगीत आणि शास्त्रीय संगीत अशा विविध शैलींमध्ये पखवाजाचे महत्त्व अधोरेखित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच चार पखवाज वादकांसह सादर होणारा त्यांचा ‘पखवाज तालस्पर्श’ हा कार्यक्रम रसिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
लोकमत सखी मंचच्या संस्थापिका स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतींना समर्पित असलेला हा सोहळा संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या सोहळ्याप्रसंगी प्रख्यात गायक नितीन मुकेश यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, पंडित राजा काळे यांचाही गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमात २०२२ चे पुरस्कार विजेते मेहताब अली नियाजी यांच्या सतार वादनाची विशेष मैफल ही रसिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील तमाम संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून, जास्तीत जास्त रसिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.