Breaking
Updated: डिसेंबर 29, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महिला उमेदवारांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नगरपालिकेच्या एकूण ३१ जागांपैकी तब्बल १७ जागांवर महिलांनी विजय मिळवत शहराच्या राजकारणात आपले अढळ स्थान सिद्ध केले आहे. या निकालामुळे नगरपालिकेत आता महिलांची शक्ती निर्णायक ठरणार असून सत्तेचा रिमोट कंट्रोल आता खऱ्या अर्थाने महिलांच्या हाती आला आहे.
अंबाजोगाई नगरपालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षानंतर झाली. यामुळे उमेदवारांसह मतदारांमध्ये उत्साह होता. राजकारणातील ‘अर्धे आकाश’ व्यापणाऱ्या महिलांनी अंबाजोगाई नगरपालिकेत ५० टक्क्यांहून अधिक जागा जिंकून पुरुषांनाही मागे टाकले आहे. केवळ आरक्षित जागाच नव्हे, तर खुल्या वर्गातूनही महिलांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. मात्र बहुतांश महिला निवडून आल्यानंतर त्यांचे पती किंवा मुलगा ‘नगरसेवक’ म्हणून काम पाहतात, असे चित्र पाहायला मिळते. यामुळे महिलांना मिळालेल्या आरक्षणाचा आणि प्रतिनिधित्वाचा मूळ उद्देश साध्य होत नाही. त्यामुळे या निवडणुकीत विजयी झालेल्या महिलांनी स्वतः सभागृहात उपस्थित राहून शहराचे प्रश्न मांडून सक्रियपणे काम करावे, अशी रास्त अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होत आहे. निवडूण आलेल्या या 17 रणरागिणींनी विकासाचे नवे पर्व सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विजेत्या महिला लोकप्रतिनिधी
शामशाद बेगम अय्युब कुरेशी, काळे मैनाबाई सदाशिव, शेख शिरीन अशफाक, सौ. श्रुती अमोलराव लोमटे, लोमटे संगिता दाजीसाहेब, देशपांडे सुचिता अतुल, सोनल श्रीकांत धायगुडे, गंभिरे शिल्पा संजय, लोमटे दिपा बबन, परदेशी रचना किशोरकुमार, सरवदे सोनी दत्तात्रय, शेख शमीम शेख रहीम, सय्यद बशीरा शफीक, पठाण नाजनीन बेगम अकबरखाँ, आदमाने बबीता महादेव, साठे जयश्री पृथ्वीराज, जाधव रेखा विलास. यामध्ये लोकविकास महाआघाडी 10 तर परिवर्तन जनविकास आघाडी 07 अशा 17 महिला सभागृहात जाणार आहेत. निवडणूकीत निवडणूक आलेल्या महिलांची टक्केवारी ५४.८% एवढी आहे.