Breaking

महिलेला बेदम मारहाण करत लुटले ७० हजारांचे गंठण

Updated: एप्रिल 10, 2026

By Vivek Sindhu

महिलेला बेदम मारहाण करत लुटले ७० हजारांचे गंठण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरूर कासार: शिरूर कासार तालुक्यातील बारणी येथे पाईपलाईनचे पाणी शेतात आल्याच्या कारणावरून एका ४५ वर्षीय महिलेला बेदम मारहाण करून तिच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण ओरबाडून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना आठ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी शिलाबाई नानासाहेब मिसाळ (वय ४५, रा. बारणी, ता. शिरूर कासार) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ऋषिकेश भास्कर केदार, अशोक भाऊसाहेब केदार, भास्कर बुवासाहेब केदार आणि रणजित बुवासाहेब केदार (सर्व रा. बारणी, ता. शिरूर कासार) यांनी संगनमत करून शिलाबाई यांच्याशी वाद घातला. तुमच्या पाईपलाईनचे पाणी लीकेज होऊन आमच्या शेतात कसे काय येते, असे म्हणत या चौघांनी शिलाबाई यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी ऋषिकेश आणि अशोक यांनी शिलाबाई यांचा गळा पकडून त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी पाठीवर आणि मांडीवर बेदम मारहाण केली. यावेळी भास्कर आणि रणजित यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याच झटापटीत आरोपी ऋषिकेश आणि अशोक यांनी शिलाबाई यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे आणि सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण तोडून नेले.

या गंभीर घटनेनंतर शिलाबाई मिसाळ यांच्या फिर्यादीवरून शिरूर कासार पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार नागरगोजे करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


Categories

Recent Posts