Breaking

बायको नांदायला येईना, दारुड्या पतीने सासऱ्याचे घर पेटवले!

Updated: मार्च 7, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाई तालुक्यातील धक्कादायक घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई तालुक्यातील धक्कादायक घटना

अंबाजोगाई: पत्नीने दारू सोडल्याशिवाय नांदायला येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने सासरच्या घरालाच पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी सुलोचना राहुल जगताप (वय ३५, रा. कोल्हेवाडी, ता. केज) या पती राहुल दत्तुपंत जगताप याच्या दारूच्या सवयीला कंटाळून मागील आठ दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळाधायगुडा येथे आपल्या माहेरी राहत होत्या. राहुल जगताप हा सतत दारू पिऊन सुलोचना यांना त्रास द्यायचा, त्यामुळे त्यांनी माहेरचा रस्ता धरला होता.

५ मार्च २०२६ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी राहुल सासरच्या घरी पोहोचला आणि त्याने सुलोचना यांना नांदायला चालण्याची मागणी केली. त्यावेळी सुलोचना यांनी “तुम्ही दारू पिणे बंद करा, मगच मी सोबत येईल” असे ठणकावून सांगितले. या उत्तराने संतप्त झालेल्या राहुलने “तुम्हा सर्वांना आता दाखवतो” असे म्हणत सोबत आणलेल्या कॅनमधून घराच्या दरवाजावर आणि खिडकीतून आत पेट्रोल ओतले आणि आग लावून दिली.

या आगीत घरातील टीव्ही, फ्रीज, कपडे आणि इतर गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून सुमारे ४०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात सुलोचना यांची मोठी बहीण जयश्री हिच्या तळपायाला गंभीर भाजले आहे. शेजाऱ्यांनी धाव घेत दरवाजा तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर आरोपी राहुल जगताप घटनास्थळावरून पसार झाला आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. एपीआय रंगनाथ जगताप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts