Breaking
Updated: सप्टेंबर 15, 2025
आष्टीत अतिवृष्टी; खा.सोनवणेंकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelविविध गावात जाऊन साधला नागरिकांशी संवाद, जिल्हाधिकाऱ्यांना मदतीच्या सुचना
बीड: बीड जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून अतिवृष्टी होत असून आष्टी तालुक्यातील विविध गावात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. याच बरोबर नदीचे पाणी गावात आणि शेतात शिरल्याने अतोनात नुकसान झाले असून खा.बजरंग सोनवणे यांनी दि.१५ रोजी दुपारी तातडीने आष्टी तालुक्यातील विविध गावात जावून नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत संपूर्ण माहिती घेवून जिल्हाधिकारी यांना मदतीच्या सुचना देखील दिल्या.
बीड जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस झाला होता. यानंतर सोमवारी पहाटे पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात जिल्ह्यात १५ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथील नदीला मागील अनेक वर्षात प्रथमच मोठा पुर आल्याने पुराचे पाणी गावात शिरले. यात अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी गेल्याने मोठे नुकसान झालेला आहे. शिवाय याच भागातील अनेकजण पुराच्या पाण्यात अडकलेले होते. ही माहिती खा.बजरंग सोनवणे यांना समजल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांना संपर्क करून पुरात अडकलेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत करून पाण्यातून बाहेर काढण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सुचना दिल्या होत्या. यानंतर प्रशासनाने मदतकार्याची गती वाढवून पुरातील नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविले. याच बरोबर खा.बजरंग सोनवणे हे दुपारपर्यंत जिल्ह्यातील पुरपरस्थितीचा आढावा घेवून आवश्यक ती मदत करण्याबाबत प्रशासनाशी संपर्क ठेवून होते. यानंतर दुपारी त्यांनी आष्टी तालुक्यातील हारेवाडी, केळ, दौलावडगाव, गहूखेल, पिंपरीघाटा, धामनगाव गावाचा दौरा जाहिर करत तातडीने आष्टी तालुक्यातील गावात भेट देवून पुरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आष्टी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे मान्यवर नेते उपस्थित होते. खा.बजरंग सोनवणे यांनी नागरिकांशी संवाद साधत आपण आपल्याला मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर मदत करू, असा विश्वासही यावेळी त्यांनी दिला.
००
खासदारांची मजबूत वॉर रुम
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी दिवसभरात विशेष वॉर रुम कार्यान्वित केले. दिवसभरात प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर त्वरित उपाययोजना सुरू केल्या गेल्या आहेत. वाहतूक, रस्ते, पूरग्रस्त भागातील नागरिकांची सुरक्षितता आणि मदत याबाबत स्थानिक प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या गेल्या.