Breaking
Updated: नोव्हेंबर 17, 2025
विविध मागण्यांसाठी कार्यकर्त्याचे तहसीलसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज सुकळी (ता. केज) येथील ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक पवार, ग्रामसेवक एस. एम. राऊत व सरपंच नितीन साहेबराव गायकवाड यांनी संगणमताने १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. यासह विविध मागण्यांसाठी अमर मोहन गायकवाड यांनी सोमवारी सकाळी ११ वाजेपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
सुकळी येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस. एम. राऊत यांच्या सांगण्यावरून शिपाई वाघमारे हे २५ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्याही प्रकारची ग्रामसभा झालेली नसताना रजिस्टरवर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या घेत असल्याने कार्यवाही करण्यात यावी. खर्डा, चौसाळा, साळेगाव माळेगाव, लोखंडी सावरगाव राज्य मार्ग ६४ दुरुस्तीसाठी यश कन्स्ट्रक्शनसाठी केज तालुक्यातून खडी, मुरूम, गौण खनिज यांचा उत्खनन परवाना, भरलेली रॉयल्टी, उत्खनन ठिकाणचे जिओ टॅगींग फोटो व इतर सर्व माहिती देण्यात यावी. धनेगाव येथील धरणामध्ये सुकळी ते गोटेगाव दरम्यान केजडीतील पाणी शेतामध्ये मागील तीन महिन्यापासून साठून आहे. त्याचा महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करावा. धरणात गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळालेला असताना सुकळी येथील शेतकरी २०२२ पासून शासनाच्या विमा व अनुदानाचा लाभ घेत आहेत. याप्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करून विमा व अनुदानाची रक्कम परत घ्यावी. सुकळी गावात सन १९९८ मध्ये गावठाण विस्तार योजनेतून भूमी संपादन करून वाटप करण्यात आले होते. हे प्लॉट घर बांधकामासाठी वितरित करण्यात आले होते. या प्लॉटवर घराचे बांधकाम सहा महिन्यामध्ये करावे लागेल अन्यथा प्लॉट परत घेण्यात येईल असा नियम असून देखील तब्बल २७ वर्षे उलटून गेले तरी काही प्लॉट वरती कोणत्याच प्रकारचे घर बांधकाम करण्यात आलेले नाही. तरी या प्लॉट धारकांवर शर्तभंगाची कार्यवाही करीत सदर प्लॉट गावठाण विस्तार योजनेतून वंचित राहिलेल्या गरजू लोकांना वितरित करण्यात यावेत. या मागण्यांसाठी अमर मोहन गायकवाड यांनी सोमवारी सकाळी ११ वाजेपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.