अंबाजोगाई – दि. २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पुढाकारातून देशभरातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांमार्फत ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात येणार असून, या अभियानात दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई जिल्ह्यातील नियोजन व सक्रीय सहभाग घेणार आहे, अशी माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांनी दिली.
अभियानाच्या अनुषंगाने अंबाजोगाई केव्हीकेने बहुशाखीय शास्त्रज्ञ दोन पथके स्थापन केले असून, प्रत्येकी पथकामध्ये ४-५ केव्हीके कर्मचारी, आयसीएआर संस्थांचे २ शास्तज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे १ वैज्ञानिक, राज्य कृषी विभागाचे सर्व तालुका कृषी अधिकारी व क्षेत्रीय, तालुका आत्मा कार्यालयाचे २ अधिकारी, शेतकरी उत्पादन कंपनीचे सदस्य, प्रगतशील शेतकरी, इफको, फर्टीस-नागार्जुन कंपनीचे प्रतिनिधी तसेच रिलायन्स फाउंडेशन बीडचे जिल्हा प्रमुख सहभागी होणार आहेत.
या अभियानाद्वारे अंबाजोगाई, केज, परळी, धारूर, वडवणी व माजलगाव या सहा तालुक्यांतील ९० गावांमधील १८,००० शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचविली जाणार आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, सेंद्रिय व रासायनिक खतांचे समतोल व्यवस्थापन, मृद आरोग्य, बीज उगवण चाचणी व प्रक्रिया, खत विद्राव्यता चाचणी, कृषी ड्रोनचे प्रात्यक्षिक, तसेच कृषी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
ऑडिओ-व्हिज्युअल कृषिरथ हा अभियानाचा एक विशेष भाग असून, तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी माध्यम ठरेल. या कृषिरथासोबत शास्त्रज्ञांचे पथक गावागावात जाईल, प्रशिक्षणात्मक व्हिडिओ, ऑडिओ जिंगल्स प्रसारित होतील तसेच कृषी तंत्रज्ञानावर आधारित माहिती पत्रके वितरीत करण्यात येणार आहेत.
अभियानामध्ये कृषीसखी, सीआरपी, कृषीमित्र, आशा वर्कर यांचा सक्रिय सहभाग असून, ते शेतकऱ्यांचे संघटन, उपस्थिती व संवाद साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतील. या अभियानात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद इत्यादी खरीप पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, कृषी ड्रोनचे वापर, कृषीतील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन पिक योजना, तसेच शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. “अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक घटक एकत्र येवून खरीप २०२५ अधिक यशस्वी ठरेल,” असे प्रतिपादन डॉ. वसंत देशमुख यांनी केले.