Breaking
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाईत कोचिंग क्लासेस व वसतिगृहांतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलीसांनी घेतली महत्वपूर्ण बैठक
अंबाजोगाई : सध्या राज्यभरात कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रे व वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींवरील छेडछाड व अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना अंबाजोगाईत घडू नयेत यासाठी शहर पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
याच अनुषंगाने बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व।उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहरच्या वतीने आनंदनगर मधील ट्युशन परिसरात विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस अंबाजोगाई शहरातील एकूण ४५ कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्रे, अभ्यासिका व वसतिगृहांचे संचालक उपस्थित होते. बैठकीत विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत विविध कठोर उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार सर्व क्लासेस, अभ्यासिका व वसतिगृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, तक्रार पेटी व रजिस्टर उपलब्ध करून देणे, सुरक्षा रक्षकांची नेमणूक, स्वतःची पार्किंग व्यवस्था तयार करणे, मुलींसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहांची सुविधा, १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना दुचाकी चालवण्यास मज्जाव व त्यांच्या पालकांना स्पष्ट सूचना देणे आदी महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करण्याबाबत संचालकांना सूचना देण्यात आल्या.
या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार संतोष बदने उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले की, सुचना देऊनही जर १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना दुचाकी वापरू दिल्यास संबंधित पालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. तसेच शाळा, कॉलेज व क्लासेस परिसरात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील पोलिसांनी दिला.
पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहरच्या वतीने सर्व शैक्षणिक संस्थांना सहकार्य करत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सजग पावले उचलण्यात येणार असल्याचा विश्वास या बैठकीतून देण्यात आला.
Last Updated: July 5, 2025