बीड : पेठ बीड पोलिसांनी आज 16 जून 2025 रोजी मोमीनपुरा परिसरात अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकत एक इसमास रंगेहाथ पकडले. ‘व्हिडिओ गेम’च्या नावाखाली कमी पैशात जास्त कमाईचे आमिष दाखवून नागरिकांना फसवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांना मिळाल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईत शेख इम्रान शेख दस्तगीर (वय 28, रा. मोमीनपुरा) यास अटक करण्यात आली असून, तो मोमीनपुरा येथील “गेमिंग गोन” नावाच्या गाळ्यात इलेक्ट्रॉनिक साहित्य वापरून नागरिकांना जुगार खेळवत होता. पोलिसांचे पथक पोहचताच काही खेळाडू घटनास्थळावरून पळून गेले.

पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून एकूण ₹42,750/- किमतीचा मुद्देमाल, त्यात व्हिडिओ गेमचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 171/2025, कलम 12(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज व त्यांच्यासोबतचे अधिकारी पोह सुभाष, पोअं अल्ताफ, अशपाक, चालक पोह इम्रान यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.