बीड – ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असून, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. बीड येथे आयोजित ऊसतोड कामगारांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना अजितदादांनी स्पष्ट केले की, ऊसतोड मजुरी ही आता कालबाह्य होत चाललेली प्रक्रिया आहे. भविष्यात सर्व ऊस हार्वेस्टरच्या माध्यमातूनच तोडला जाणार आहे. राज्यात ऊसतोड करणाऱ्या मजुरांची ही शेवटची पिढी ठरावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मजुरांना पर्यायी व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देताना अजितदादांनी सांगितले की, त्यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन झाले. हे महामंडळ सध्या सामाजिक न्याय विभागाकडे आहे, मात्र ते नियोजन विभागाकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करावी लागेल, असे त्यांनी नमूद केले.
बीडच्या पायाभूत सुविधांसाठी पवारांचा पुढाकार
बीड जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले की, रस्ते, पाणी आणि रोजगार या तिन्ही मुद्द्यांवर ठोस काम केले जाईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत त्यांनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे १७ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे संकेत दिले. बीडच्या विमानतळाच्या प्रश्नावरही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करून डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया लवकरच हाती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
शिस्तभंग करणाऱ्यांना अजितदादांचा इशारा
कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरही अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका घेत पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले. “कोणीही चुकीचे वागत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. शिस्त सर्वांनी पाळली पाहिजे. कोणी ऐकत नसेल तर मोका लावू. मग आत जाऊन ‘चक्की पिसिंग अँड पिसिंग’ करावं लागेल,” असा इशारा देत त्यांनी कायदा हातात न घेण्याचं आवाहन केलं.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकाच व्यासपीठावर
या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, विरोधी राजकीय भूमिका घेणारे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस एकाच व्यासपीठावर प्रथमच एकत्र दिसले. त्यांच्या सोबत आमदार संदीप क्षीरसागरही होते. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचे आरोप-प्रत्यारोप सुरू होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात दोघेही एकमेकांपासून अंतर राखून बसले, मात्र मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र व्यासपीठावर दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.