Breaking
Updated: सप्टेंबर 11, 2025
'त्या' चिमुरडीचा गळफास लावलेला मृतदेह आढळला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelदोन दिवसांपूर्वी वडिलांनीही केली होती आत्महत्या
बीड : रामगड परिसरात आज सकाळी एका तीन वर्षीय चिमुरडीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी इमामपूर रोड परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सलग दोन दिवसांत घडलेल्या या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव जयराम बोराडे असे असून त्यांनी दोन दिवसांपूर्वीच गळफास घेऊन जीवन संपवले होते. त्यावेळी त्यांची तीन वर्षांची मुलगी घराबाहेर गेल्याचे सांगण्यात आले होते. तिचा शोध सुरू असतानाच आज सकाळी रामगड परिसरातील एका लिंबाच्या झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना दिसला.
मुलीच्या मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. ही दुहेरी घटना कौटुंबिक कारणांमुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.